माझ्या मना दगड नको बनूस…!

0

चूप रहना आसान नहीं है. चूप रहने से आप पत्थर बन जाते हैं. कुछ लोग आपसे टकराकर मर जाते हैं, कुछ लोगों को आप मार देते हैं, असे एक वाक्य ज्येष्ठ पत्रकार रविशकुमार यांच्या एका प्राइम टाइममध्ये त्यांच्याच तोंडून ऐकलं होतं. हे वाक्य बर्‍याच अंगांनी विचार करायला भाग पाडणारं होतं. मी मात्र या वाक्याला सध्याच्या समकालीन अमानवीय गोष्टींच्या संदर्भात चिडीचूप असलेल्या व्यक्तींवर लादून पाहिले, तर तिथे हे वाक्य परफेक्ट बसले. अनेक घटना आपल्या अवतीभवती घडत असतात. व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकसारख्या सोशल मीडियातून काही घटनांचे फोटो आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण हादरून जातो. अरे हे काय चाललंय? कधी थांबणार हे? असे प्रश्‍न लिमिटेड असलेल्या ग्रुपमध्ये करून दुसर्‍या दिवशी आपल्या दिनचर्येला लागतो. आपल्यातील माणूस मरत चालला असल्याचे हे लक्षण आहे.

गाडीतून मांस नेले म्हणून झुंड गाडीच्या ड्रायव्हरला बेदम मारहाण करते. आंतरजातीय विवाह केला म्हणून बाप मुलीचा गळा चिरतो. आंबेडकरांची रिंगटोन वाजली म्हणून पोराला जीवे मारले जाते. मुलींवर पाशवी बलात्कार करून अतिशय क्रूरतेने तिला संपवले जाते. मुली नको म्हणून कित्येक कळ्या जन्माआधीच खुडल्या जातात. लैंगिक तृप्तीसाठी कासावीस झालेला बाप स्वतःच्याच चिमुरड्या मुलीवर बलात्कार करतो आणि मारून टाकतो. गाय विकायला चाललेल्या 12 वर्षांच्या पोराला मारून टाकले जाते. अशा अनेक घटना राष्ट्रीय अस्मितेपासून ते धार्मिक व्हाया जातीय अस्मितेच्या भंपक कल्पनांमुळे घडल्या आणि घडवल्या जातात. या घटनांची भयानक रूपे सामान्य म्हणवल्या जाणार्‍या आपल्या समाजात अगदी सहजपणे बघायलादेखील उपलब्ध होतात. यानंतर आपल्या सोयीनुसार आपण त्या घटनेला समर्थन अथवा विरोध करून सार काढून आपल्या कामाला लागतो. पुन्हा दुसरी घटना घडल्यावर चाय पे चर्चा टाइप चर्चा करायला एकत्र होतो.

हे चित्र खरोखर भयावह आहे. आपण भलं आपलं काम भलं ही वृत्ती फार मोठ्या विनाशाला कारण होऊ शकते ही गोष्ट आता आपल्या लक्षात यायला हवीय. व्यक्तिद्वेष, जात-धर्म द्वेष हा फार प्राथमिक स्तरावर बीजारोपण करतो. अशी विकृत बीजे तिथेच खुडली जाणे आवश्यक आहे. कुठल्याही विखारी विचारांचे समर्थन तर करू नयेच मात्र असे विचार रुजत असलेल्या ठिकाणी आपण योग्य पद्धतीने व्यक्त व्हायला हवे. यामुळे विचारांमध्ये परिवर्तन येऊन बदलांचीदेखील शक्यता आहे. मात्र, आपल्या चूप राहण्याने फार मोठा अनर्थ होण्याला सुरुवात झालेली असते हे लक्षात घ्यायला हवे.
आपण सामान्यतेची व्याख्या आणि आपल्या विचारांना दिलेला, आपल्याला काय करायचंय, हा सेफ झोन तोडून टाकणे आता गरजेचे बनलेले आहे. आसामाजिक आणि अमानवीय घटनांवर आपण कितीही सामान्य असलो तरी व्यक्त व्हायलाच पाहिजे. आपण कुठे आहोत, कोण आहोत हे महत्त्वाचे नसून आपण जिथे आहात जसे आहात त्या ताकतीने अशा घटनांवर व्यक्त व्हावे. माझ्या मना बन दगड… ही संकल्पना मोडीत काढली, तरच संतुलित समाजव्यवस्थेचे स्वप्न आपण पाहू शकतो.