माझ्या मराठीचा झेंडा

0

मराठी भाषेची अलौकिकता…
मराठी भाषा दिनानिमित्त राज्यभर मराठीचा उत्सव साजरा होतोय.13 कोटी जनतेचा अभिमान असलेल्या मराठीचा झेंडा सातासमुद्रापार गेलाय. जगभरात 50 बृहनमराठी मंडळे आहेत. त्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून अजूनही दिल्ली दरबाराचे दरवाजे ठोठवावे लागतात. त्याचसाठी परवा गेलेल्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाला केंद्रिय मंत्र्यांनी नकाराचा दणका दिलाय.

मराठी भाषा मला आईसारखी आणि गार सावलीसारखी वाटते पण तीचा जास्त अभिमान वाटतो तो नामदेव ढसाळांच्या तळपणार्‍या लेखणीत. तुमच्या ददद चे कानोले कुरतडणार्‍या संस्कृतीचा मी कर्दनकाळ आहे, असे म्हणत तो जेव्हा बुरसटलेल्या संस्कृतीच्या हस्तीदंती मनोर्‍यातील अभिजनांच्या छातीवर दस्तक देतो तेव्हा इथल्या राजसत्तेलाही आपल्या पायाखालची जमीन सरकल्याचा आभास जाणवला होता. तुमची सनातन दया संत फॉकलँड रस्त्यावरच्या भडव्यांपेक्षा उंच नाही, असे छातीठोकपणे सांगत दया नाकारणारा नामदेव हा मराठी भाषेला उंचीवर नेव्हून ठेवणारा मला वाटतो. त्याची गोलपिठा, दया पवारांचे बलूतं, लक्ष्मन मानेंचा उचल्या, लक्ष्मण गायकवाडांची उपरा, भालचंद्र नेमाडेंची कोसला, झुल, जरीला, बिढार, अशा अनेक कवितासंग्रह आणि कादंबर्‍यांनी मराठी भाषा खर्‍या अर्थाने समृध्द केली. महाराष्ट्रात मधल्या काळात एकाबाजूला युक्रांदच्या तालमीत तयार झालेले तरुण, दलित पँथर्सचा साहित्यप्रक्षोभ, नक्षलवादाने प्रेरित झालेले नव-कम्युनिस्ट असे एक वातावरण तर दुसर्‍या बाजूला अ‍ॅकॅडेमिक साहित्याचा व समीक्षेचा सरोजिनी वैद्य, विजया राजाध्यक्ष आदींचा वाङ्मयीन दबदबा. सत्यकथाफ नावाचे साहित्यिक केंद्र होते. श्री. पु. भागवत त्यात प्रभावशील होते. मध्यवर्गीयांना रिझविण्याची संपूर्ण जबाबदारी पु.ल. देशपांड्यांवर पडली. सत्यकथा नावाच्या प्रस्थापिताला समांतर असा लघुनियतकालिकांचा प्रवाह आणि वाङ्मयक्षेत्रातील माहिती व गॉसिपचे व्यासपीठ (आणि चव्हाटा) ललितच्या उदयाने सुरू झाला. घाशीराम कोतवाल, सखाराम बाईंडर, गिधाडे सत्तरीच्या पूर्वार्धातले. चिं.त्र्यं. खानोलकरांची मिस्टरी आणि कोकणी गूढ त्याचप्रमाणे दिलीप चित्रेंची, विलास सारंगांची बंडाळी याच काळातली. नेमाडी पंथातील नवविद्वान आणि भाऊ पाध्येंची वासुनाका हीसुद्धा साठीच्या दशकातलेच. दलित पँथर्सनी साठीच्या अखेरीस आणि सत्तरीच्या सुरुवातीस दिलेले आव्हान जितके उग्र तितकेच आश्‍वासकही होते.

मराठी भाषेचा सर्वांनाच अभिमान आहे. मराठी भाषेचा उदय संस्कृतच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला. असे बहुतांशी मानले जाते. पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली. मराठी ही भाषा देवनागरी लिपी मधुन लिहिली जाते. यादव काळात मराठी भाषेतील लिखानाचे दाखले मिळतात. हा काळ इ.स. 1250 ते इ.स. 1350 असा आहे. देवगिरीच्या यादवांचे महाराष्ट्रावर राज्य असल्याने मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा होता. अनेक लेखक व कवी यांना राजाश्रय होता. याच काळात महानुभाव या पंथाची सुरुवात झाली. चक्रधर स्वामी, भावे व्यास, महिंद्र व्यास, नागदेव आणि महदंबा यांनीही मराठी वाङमयात महत्त्वाची भर घातली. वारकरी संप्रदायास सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या बहुतेक सर्व जातीत यामुळे संतांची परंपरा जन्मास आली व त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे काव्यरचनेस सुरुवात केली. नामदेवशिंपी, गोरा कुंभार, नरहरी सोनार, सावता माळी, चोखा मेळा, बंका महार, सेना न्हावी, कान्होपात्रा यांनी भक्तिपर काव्यरचना केल्या व मराठी साहित्याचे दालन वैविध्यानी समृद्ध केले.

इ.स. 1278 मध्ये म्हाइंभट यांनी लीळा चरित्र लिहिले. त्यानंतर इ.स. 1290 मध्ये नव रसांनी ओतप्रोत भरलेल्या ज्ञानेश्‍वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्‍वरांनी केली. महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात मौलिक भर घातली. संत एकनाथ यांनी या भाषेत भारुडे लिहिली आणि एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आदि ग्रंथांची भर घातली. शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर मराठी भाषेला खर्‍या अर्थाने राजाश्रय मिळाला. शिवाजी महाराजांचा काळ इ.स. 1600 ते इ.स. 1700 असा आहे. या काळात मराठी स्वराज्याची स्थापना झाल्याने मराठी भाषेवरील फारसी शब्दांचे आक्रमण थंडावले. असे मानले जाते की शिवाजी महाराजांनी रघुनाथ पंडित यांना राज्यव्यवहार कोश बनवतांना फारसी ऐवजी संस्कृत शब्द योजना करण्यास सांगितले. याच काळात मराठी भाषेला राजमान्यतेसोबत संत तुकाराम यांच्या ओव्यांमुळे लोकमान्यताही मिळू लागली. मुक्तेश्‍वर, वामन पंडित यांनीही मराठी काव्य विकसित केले. या शिवाय शिवकल्याण, रमावल्लभदास, मोरया गोसावी, संत महिपती यांनी संत चरित्रे लिहुन संतविजय, भक्तिविजय आदि ग्रंथांद्वारे मराठी भाषेत मोलाची भर घातली. त्यानंतर इ.स. 1700 ते इ.स. 1818 याकाळात मोरोपंतांनी मराठी भाषेत ग्रंथरचना केल्या. तसेच श्रीधर या कवीने आपले हरिविजय व पांडव प्रताप या काव्यांद्वारे खेड्यापाड्यात आपल्या मराठी कविता पोहोचवल्या. याच काळात शृंगार व वीर रसांना स्वतंत्र स्थान मिळाले. यासाठी लावणी व पोवाडा हे हे नवीन वाङ्मय प्रकार मराठीत निर्माण झाले. याच काळात बखर लेखनाची सुरुवात झाली. निरंजन माधव, कृष्ण दयार्णव, रामजोशी, प्रभाकर, होनाजी बाळा, सगन भाऊ हे या काळातील महत्त्वाचे कवी आहेत. महाराष्ट्र राज्य हे ग्रंथप्रेमींचे राज्य मानले जाते. येथे वाचक संस्कृती आहे. देशभरातील एकूण ग्रंथालयांतली 25 टक्के ग्रंथालये एकट्या महाराष्ट्रात आहेत.

मराठी ही इंडो-युरोपीय भाषाकुलातील एक भाषा आहे. भारतातील प्रमुख 22 भाषांपैकी मराठी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी मातृभाषा असणार्‍या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे. मराठी भाषा भारतासह मॉरिशस व इस्रायल या देशांतही बोलली जाते. त्याचबरोबर जगभरात विखुरलेल्या मराठी-भाषकांमुळे मराठी अमेरिकेची संयुक्त संस्थाने, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंड येथेही बोलली जाते. महाराष्ट्राबाहेरील गोवा विद्यापीठ (पणजी), महाराजा सयाजीराव विद्यापीठ (बडोदे), उस्मानिया विद्यापीठ (तेलंगाणा), गुलबर्गा विद्यापीठ, देवी अहिल्या विद्यापीठ (इंदूर) व जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालय (नवी दिल्ली) येथेही मराठीच्या उच्च शिक्षणासाठीचे विभाग आहेत. गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तमिळनाडू व छत्तीसगढ राज्यांत आणि दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांतील काही भागातही मराठी बोलली जाते. मराठी भाषक मोठ्या प्रमाणात असलेले भाग- दक्षिण गुजरात, सुरत, बडोदा व अहमदाबाद (गुजरात राज्य), बेळगांव, हुबळी-धारवाड, गुलबर्गा, बिदर, कारवार (कर्नाटक राज्य), हैदराबाद (आंध्र प्रदेश), इंदूर, ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) व तंजावर (तमिळनाडू), वगैरे. देशातील 36 राज्ये आणि 72 देशांमध्ये मराठी भाषकांची वस्ती आहे. मराठी भाषा दर पंचवीस किलोमीटरवर वेगळी भासते. नदी वहाताना जशी वेगवेगळी वळणे घेते, तशी मराठी भाषा वेगवेगळ्य भागात नवी लय धारण करते. पण मूळचा गाभा मात्र तोच. या भाषेला अभिजात दर्जा मिळायला हवा. ही भाषा आणि आणि इथला राज्यकारभार बहुसंख्य श्रमिकवर्गाच्या सर्जनशील साहित्य संस्कृतीच्या बोलीभाषेलाही धरून असायला हवा. तरच तीचा विकास होईल.

राजा अदाटे
वृत्तसंपादक जनशक्ति, मुंबई
8767501111