गोपाळ जोशी
9922421535
थोर साहित्यिक आणि कविश्रेष्ठ तात्यासाहेब शिरवाडकर ही समस्त मराठी मनाची अस्मिता आहे. तात्यासाहेबांचे कार्य नव्याने सांगण्याची आवश्यकताही नाही. त्यांचाच जन्म दिन हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा येत्या मंगळवारी हा दिन राज्यभरात आणि जगभरातील मराठीजन साजरा करतील. आताशा कोणताही दिन साजरा करण्याची एक शैली ठरून गेली आहे. आपले सणवार आणि हे दिन यात त्यामुळेच काही अंतर राहिले नसावे. मराठी भाषा दिनानिमित्त राज्यभरात पुन्हा एकदा मायमराठीचे गोडवे गाणारे कार्यक्रम होतील. भाषणे होतील, कविता सादर केल्या जातील, कुठेे अभिवाचन, तर कुठे आणखी काही… सारे काही पूर्वीसारखेच. आला दिन.. गेला दिन. पुन्हा 1 मार्चपासून आपण आपले आपल्या कामात गर्क होऊन जाऊ.
मुंबईसह राज्यातील निवडणुकांचे निकाल लागत असतानाच एक बातमी माझ्या वाचनात आली. त्यातील विरोधाभास जाणवण्यासारखा आहे. मुंबईत मराठी टक्का घसरतो आहे, मराठी शाळा बंद पडत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. याच मुद्द्यावर शिवसेनेचा जन्म झाला आणि आजही याच मुद्द्यावर शिवसेना मुंबई महापालिकेत पुन्हा सत्तारूढही होणार आहे. मुंबईत मराठी टक्का आणि मराठी भाषेला प्राधान्य देण्यासाठी आता शिवसेना काय करणार, यावर विश्लेषण तज्ज्ञ मते मांडत होते. प्रश्न असा पडतो की, हे काम फक्त शिवसेनेचे आहे, की सगळ्या मराठी समाजाचे, मराठी भाषकांचे आहे? एकीकडे मुंबईत मराठी शाळा बंद पडत असल्याचे दाखले ऐकत असतानाच एका वृत्तपत्रात आलेली बातमी मी वाचत होतो. सातासमुद्रापार हॉलंडची राजधानी अॅमस्टरडॅममध्ये राहत असलेल्या मराठी बांधवांनी आपल्या मुलाबाळांना मायमराठीची ओळख व्हावी म्हणून चक्क मराठी शाळा सुरू केल्याची ही बातमी होती. हे विरोधाभासी चित्र खूप काही सांगून जाणारे आहे. इच्छा तेथे मार्ग. सत्ता नसली म्हणून सेवा करता येत नाही, असे थोडेच आहे? अशी अनेक मंडळी आता जगाच्या पाठीवर दिसतील. जगभरच्या महाराष्ट्र मंडळांनी आता आपापल्या ठिकाणी असे मराठीचे वर्ग सुरू केले आहेत. अमेरिकेत तर मराठीजनांचे संमेलनही भरते. मराठीचे संमेलन म्हणून आपणही खूश वगैरे होते. पण या सगळ्या पलीकडे काही करता येण्यासारखे नाही का?
ज्यांना इतिहासाचे विस्मरण होते त्यांचा भूतकाळही अंधकारमय असतो, अशा अर्थाची एक म्हण आहे. आपल्याबाबतीत ती तंतोतंत लागू पडावी. मराठ्यांच्या इतिहासातून शिकता येण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. पण त्यातील एक ठळक गोष्ट आवर्जून लक्षात घेतली पाहिजे. मराठ्यांनी संबंध हिंदुस्थानावर राज्य केले. ते करत असताना त्यांनी संस्थात्मक कार्याची उभारणी केली. अगदी विसाव्या शतकातील आपला इतिहास चाळला, तरी ही गोष्ट स्पष्ट होईल. पुणे, मुंबई, इंदूर, बडोदे, अशा अनेक ठिकाणी त्या काळात उभ्या राहिलेल्या संस्था आजही उत्तम काम करताना दिसतील. भाषा, इतिहास आदी विषयांतील संशोधनात अशा संस्थात्मक कार्याचेच मोल असते, हे आपल्या या पूर्वसुरींनी जाणले होते. मराठीचा टक्का वाढवण्यासाठी आज अशाच संस्थात्मक कार्याची गरज आहे, याचाच नेमका विसर आपल्याला पडला आहे. समाज म्हणून आपण त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
आज तंत्रज्ञानाच्या विकासामुळे जग जवळ आले आहे. या तंत्रज्ञानात आपले मराठीजन मागे आहेत का? असे काही नाही. उलट या क्षेत्रात मराठीभाषकांची भरारी मोठी आहे. पण या भरारीचा वापर भाषासंवर्धनासाठी करून घेण्यात आपण मागे पडतो आहोत. ही उणीव कशी भरून काढायची, याचा विचार आपण केला पाहिजे. मराठी ज्ञानभाषा व्हावी, हे सुभाषित म्हणून चांगले आहे, पण ते वास्तवात उतरायचे तर सर्वच ज्ञानशाखांची गंगा मायबोलीत उतरण्यासाठी भरीव संस्थात्मक कामच उभे करावे लागणार आहे. त्यासाठी आपण काही करतो आहोत का? तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली मराठी विश्वकोश निर्मितीला चालना दिली गेली होती. त्याचे पहिले खंडही प्रसिद्ध झाले आहेत. आता पुढच्या कामासाठी या कामाला निधी दिला गेला की नाही, हे जाणून घेण्याची तसदीही आपण घेत नाही. असेच विविध विषयांवरील कोश तयार होणे, ते सहजी उपलब्ध होणे, मराठीबरोबरच अन्य भाषांचा आणि विषयांचाही अभ्यास होणे, अशा अनेकानेक कामांतूनच मराठीचा प्रवास ज्ञानभाषेकडे होऊ शकेल आणि तसा तो व्हायचा असेल, तर संस्थात्मक कार्याला पर्याय नाही.
आपल्या झोपेचा आणखी एक मासला देता येईल. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून केंद्राकडे प्रस्ताव पडून आहे. तो लवकर मान्य व्हावा म्हणून केवळ राजकारण्यांनी नाही, तर मराठी समाजाने रेटा लावला पाहिजे. पण आपण आणि आपले राजकारणी दोघेही भाषा दिनाचे गळे काढण्यापलीकडे जात नाही. पर्यायाने काही घडत नाही. माझ्या मातीचे गायन अशी तात्यासाहेबांची एक सुंदर कविता आहे. त्यात तात्यासाहेबांनी वेगळा आशावाद जागवला आहे. पण अशा भरीव कार्याशिवाय हा आशावाद वास्तवात उतरणार नाही. तोपर्यंत आपले हे मातीचे गायन अपुरेच राहणार आहे.
यंदाचा मराठी भाषा दिन तोंडावर आहे आणि सालाबादप्रमाणे यंदाही मराठी या दिनानिमित्त कार्यक्रमांचे रतीब घातले जातील. पण त्यातून मराठीची काय सेवा होणार, हा प्रश्नच आहे. मायबोली मराठीच्या संवर्धनासाठी भरीव संस्थात्मक कार्य जोपर्यंत उभे राहत नाही, तोपर्यंत मायबोलीचे हे गायन अपुरेच राहणार आहे.