पुणे : अफझलखानला शिवरायांनी मुस्लीम होता म्हणून नाही, तर रयतेच्या राज्याचा शत्रू होता म्हणून मारले होते. याला ऐतिहासिक आधार असताना माझ्या बोलण्याचा विपर्यास केला असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. त्या कार्यक्रमात मी काय चुकीचे बोललो? असा प्रतिप्रश्नदेखील त्यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज ’गो ब्राह्मणप्रतिपालक’ नव्हते, या विधानानंतर माझ्यावर जातीयवादाचा आरोप करणार्यांच्या मनात काय खदखदत आहे हे दिसून येत आहे, अशी टिपणीदेखील पवार यांनी केली. इतिहासाचे पुनर्लेखन व्हावे का, हे सांगण्यासाठी मी काही तज्ज्ञ नाही. मात्र, या क्षेत्रातील जाणकारांनी चुकीच्या गोष्टी दुरुस्त कराव्यात, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
देशाला पूर्ण वेळ संरक्षणमंत्री हवा!
काश्मीरमधील परिस्थिती चिंताजनक असून, सैन्य दलाचे मनोधैर्य उंचावण्यासाठी देशाला पूर्ण वेळ संरक्षण मंत्र्याची आवश्यकता आहे, असे सांगून पवार म्हणाले, काश्मीरमध्ये दररोज जवान मारले जात आहेत. केंद्र सरकारनी त्याबाबत पावले उचलावीत. एकदम पाकिस्तानबरोबर युद्ध करावे, असे मी म्हणणार नाही. परंतु, ठोस कारवाई करण्याची गरज आहे. ‘ईडी’ची कारवाई कधी होतेय याची मी वाटच बघतो आहे’, अशी खोचक टिपणीदेखील पवार यांनी केली.