माणसांकडे मानवतावादी दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे

0

जळगाव । स्वातंत्र्यानंतर 65 वर्ष उलटून गेली तरीही आपल्या देशात आणि राज्यात आपण भटक्या विमुक्तांना खर्‍या स्वातंत्र्यापर्यंत पोहचवू शकलो नाही ही खेदाची गोष्ट आहे. या माणसांकडे आपण मानवतावादी दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे असे मत लातूर येथील सामाजिक कार्यकर्ते नरसिंग झरे यांनी व्यक्त केले.

मराठी विभागाच्या वतीने ‘चौकटीबाहेरचे जग’ या व्याख्यानमालेंतर्गत आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कला शाखेचे उपप्राचार्य प्रा.एन.व्ही. भारंबे, मराठी विभागप्रमुख डॉ.विद्या पाटील उपस्थित आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी होते. झरे पुढे बोलतांना म्हणाले की, मी चार भिंतींच्या बाहेरील शाळेत शिकलो.

गावातील मुलांकडूनच मला खरे शिकण्याची प्रेरणा मिळाली असेही ते म्हणाले. भटक्या विमुक्तांची शाळा सुरु केली. त्या मुलांकडून मला 8 भाषा शिकायला मिळाल्या. त्यांच्यासाठी काम करीत असतांना आलेल्या अनेक अडचणी आणि अनुभवांचे कथन त्यांनी यावेळी केले.

अज्ञात, अंधश्रध्दाने समाज गुरफटला
भटक्या विमुक्तांच्या लोककलांकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहायला हवे असेही ते म्हणाले. महाराष्ट्रात भटक्या विमुक्तांच्या 52 जमाती आहेत. ते अजूनही भयावह जीवन जगत आहेत. त्यांच्या अनेक समस्या आहेत. व्यसनाधीनता, अज्ञान, अंधश्रद्धा यांनी हा समाज गुरफटलेला आहे असेही मत त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या जगण्याला दिशा देण्याचे काम आपण सर्वांनी करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा.गणेश सूर्यवंशी यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.