शफाअत खान : भुसावळला रंगसंवाद कार्यक्रम
भुसावळ- नाटकात माणसाचं जगणं असतं त्याच जगणं बदललं की नाटकही बदलते, असे विचार प्रसिद्ध नाटककार शफाअत खान यांनी व्यक्त केले. उत्कर्ष कलाविष्कार व नाहाटा महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागात तर्फे आयोजित रंगसंवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते. पूर्ण इमानदारीने नाटक लिहिले तर ते उत्तम नाटक होते असेही त्यांनी सांगितले. शहरात स्व. देविदास गोविंद पालक स्मृती खानदेश नाट्य महोत्सवांतर्गत दोन दिवसीय रंग संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले असून बुधवारी पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांसाठी अभ्यास सत्र घेण्यात आले.
काळ बदलला की नाटकही बदलते
शफाअत खान म्हणाले, की काळ बदलला की नाटक बदलते. कारण नाटक हे त्या काळाचे वास्तव उभे करणारे असते. संबंधित काळाचे आकलन त्यामुळे होते. नाटकात नुसती गोष्ट सांगितली तर ती प्रेक्षकांची फसवणूक होईल. नाटकात गोष्टी व्यतिरिक्त काही वेगळा विचारही सांगितला गेला पाहिजे. विधीतून नाटकाचा जन्म झाला. प्रत्येक जन्मलेल्या माणसाकडे क्रिएटिव्ह पॉवर असते. नवीन निर्माण करण्याची क्षमता म्हणजे क्रिएटिव्ह पॉवर होय. जगापेक्षा वेगळं करणं, वेगळा विचार करणे म्हणजे क्रिएटिव्हिटी होय. समाजात तीन प्रकारचे लोक क्रिएटिव्ह असतात. यात आर्टिस्ट, लेखक, शास्त्रज्ञ यांचा समावेश होतो. शांततेने का होईना चांगली कृती तुम्हाला बदलविते. क्रिएटिव्ह व्यक्तीला प्रशिक्षण, प्रेरणा, प्रोत्साहन, संधी व रियाजची यांची गरज असते. नाटकासाठी मानव वंशशास्त्राचा तसेच मानसशास्त्राचा अभ्यास असणे आवश्यक आहे. त्यानंतर इतर ज्ञानशाखांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो असेही त्यांनी सांगितले. शफाअत खान यांची प्रयोगशील अभिनेते अक्षय शिंपी यांनी प्रकट मुलाखत घेतली.