मुंबई : राज्य शासनाच्यावतीने भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीतातील उल्लेखनीय योगदानासाठी दिला जाणारा 2017-18 या वर्षासाठीचा पुरस्कार जेष्ठ गायिका माणिक भिडे यांना जाहीर झाला आहे. 5 लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली. ना. तावडे यांच्या अध्यक्षतेखालील पंडित केशव गिंडे, पंडित नाथराव नेरळकर, कमलताई भोंडे या मान्यवरांच्या समितीने या पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका माणिक भिडे यांची शिफारस केली होती. यापूर्वी गानसरस्वती किशोरी आमोणकर, पंडित जसराज, प्रभा अत्रे, पंडित राम नारायण, परवीन सुलताना यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
प्रतिवर्षी राज्य शासनातर्फे शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणार्या कलाकाराला भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीत क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पंडिता माणिक गोविंद भिडे. (जयपूर – अत्रोली घराणे) यांचा 1935 साली कोल्हापूर येथे जन्म झाला. बालवयापासून संगिताची आवड असलेल्या माणिकताईंना आई-वडिलांकडून अभिजात संगीत शिकण्यास प्रोत्साहन मिळाले. जयपूर-अत्रौली घराण्याचे आद्यपुरुष उस्ताद अल्लादियाँ खाँ यांचे पुत्र उस्ताद मजी खाँ व भूर्जी खाँ साहेब यांची तालिम लाभलेले मधुकरराव सडोलीकर हे माणिकताईंना गुरू म्हणून लाभले. गोविंद भिडे यांच्याशी विवाह होऊन माणिकताई मुंबईस वास्तव्यात आल्या. या काळात सुमारे 15 वर्षे गानसरस्वती किशोरी अमोणकर यांचे शिष्यत्व माणिकताईंनी पत्करून गानसाधनेतला कळस गाठला. माणिकताई आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कलाकार असून, देश व विदेशात त्यांचे अनेक कार्यक्रम झाले आहेत. सादरीकरणासोबत सक्षम गुरू हे त्यांचे मोठे योगदान संगीत क्षेत्राला लाभले आहे.