माणुसकीला काळीमा फासला ः नराधामांना शिक्षा

0

जळगाव : भावा-भावाचे व बहिण भावाचे पवित्र असे नाते समजले नाते. वडील नसले की मोठ्या भाऊ हाच वडीलसमान असतो. मात्र पाचोरा येथील एका घटनेत मोठ्या भावानेच किरकोळ वादातून आपल्या लहान भावाचा सुर्‍याने खून केला. तर दुसर्‍या ठिकाणच्या घटनेत पाठीराखा असलेल्या भावाने बहिणीच्या 14 वर्षाच्या मुलीवर शारीरीक अत्याचार करुन तीला कुमारी माता बनविण्याचे घृणास्पद कृत्य केले, अन् बहिणीसोबतच्या भाऊ म्हणून असलेल्या पवित्र नात्याचा खून केला. 2017 व 2018 या वर्षांमध्ये घडलेल्या या घटनांमध्ये माणुसकीला काळीमा फासणार्‍या या नराधामांना जिल्हा न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. यात खून करणार्‍या भावाला जन्मठेप तर भाचीला कुमारी माता बनविण्यार्‍या नराधाम मामाला 14 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा न्यायालयाने वेगवेगळ्या खटल्यांचा मंगळवारी निकाल दिला.

अल्पवयीन भाचीवर अत्याचार करणार्‍या मामास 14 वर्षे सश्रम कारावास

जळगाव । पतीच्या निधनानंतर शेतीकामात सहकार्य व्हावे म्हणून पत्नीने आपल्या सिल्लोड तालुक्यातील म्हसला येथील भावाला गावी बोलावून घेतले. या नराधाम भावाने बहिणीच्या इयत्ता आठवीतील मुलीवर तिच्यासह कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत वेळावेळी शारिरीक अत्याचार केले. या अत्याचारामुळे मुलगी 26 ते 28 आठवड्यांची गरोदर राहिल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना 2018 मध्ये घडली होती. या गुन्ह्यात न्यायालयाने आरोपी मामा गणेश पोपट खवले वय 24 रा. म्हसला. ता. सिल्लोड जि.औरंगाबाद यास 14 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्या. पी.वाय.लाडेकर याच्या न्यायालयाने मंगळवारी हा निकाल दिला.

भडगाव तालुक्यात एका गावात पिडीत आईसह वास्तव्यास आहे. वडीलांचे निधन झाल्याने आईने पिडीतेचे मामा गणेश खवले यास बोलावू घेतले. यादरम्यान गणेश याने तुला तसेच तुझ्या कुटुंबाला जीवे मारुन टाकेल अशी धमकी देवून 14 वर्षांची अल्पवयीन भाची हिच्यावर वेळावेळी अत्याचार केले. एके दिवशी पिडीतेच्या पोटात दुखू लागले. रुग्णालयात तपासणी केली, पिडीत मुलगी गरोदर असलयचे समोर आले होते. पिडीतेस तिची आई व काका तसेच काकू यांनी विश्वासात घेवून विचारणा केल्यावर गणेश खवले याने हे घृृणास्पद कृत्य केल्याचे समोर आले होते. यानंतर पिडीतेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन भडगाव पोलिसात आरोपी गणेश खवले विरोधात भादंवि कलम 376, कलम 506 आणि बालकांचे लैगिंक अपराधांपासून संरक्षण अधिनियम कलम 3, 4,5 व 6 अन्वये गुन्हा दाखल झाला होता.


पीडीतेच्या नवजात बाळासह आरोपीची डीएनएची तपासणी

सहाय्यक पोलीस निरिक्षक रविंद्र जाधव यांनी गुन्ह्याचा तपास करुन भडगाव न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. जिल्हा न्यायालयातील न्या. पी.वाय. लाडेकर यांच्या न्यायालयात हा खटला चालला. खटल्यात पिडीतेची आई, पिडीत बालिका, पिडीता, डॉक्टर डी.एन.ए. तज्ञ अशा एकूण 13 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली होती. पिडीता व तिच्या नवजात बाळाचीही डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येवून डी.एन.नमुने घेण्यात आले होते. – अशा साक्षीपुरावा ग्राह्य धरुन न्या. लाडेकर यांनी आरोपी गणेश खवले यास दोषी धरुन कलम 376 अन्वये 10 वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रुपय दंड, दंड न भरल्यास 6 महिन्यांची साधी कैद, कलम 506 अन्वये 3 वर्ष सश्रम कारावास, 1 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 1 महिन्यांची साधी कैद व बालकांचे लैगिंग अपराधांपासून संरक्षण अधिनियम कलम 6 अन्वये 14 वर्ष सश्रम कारावास व 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली. खटल्यात सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. प्रदीप महाजन यांनी काम पाहिले. भडगाव पोलीस स्टेशनचे केसवॉच समाधान पाटील, पैरवी अधिकारी अनिल सपकाळे यांनी सहकार्य केले.

भावाचाच खून करणार्‍या सख्या भावाला जन्मठेपेची शिक्षा

जळगाव । पाचोरा येथे घरातील बाथरुमचा वास येत असल्याने यात पाणी टाकण्यावरुन झालेल्या वादातून रावसाहेब रामा निकम याने सुर्‍याने सख्खा भाऊ दिपक रामा निकम यांचा खून केल्याची घटना 17 एप्रिल 2017 रोजी घडली होती. या गुन्ह्यात जिल्हा न्यालयाने आरोपी रावसाहेब रामा निकम यास जन्मठेप व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा न्यायालयाचे न्या. एस.जी. ठुबे यांनी निकाल दिला.

पाचोरा शहरातील हनुमान नगर येथे दिपक रामा निकम हे पत्नीसह व मुलांसह राहत होते. दिपक यांची पत्नी गावाला गेली होती. यादरम्यान 17 एप्रिल 2017 रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास दिपकचा मोठा भाऊ रावसाहेब रामा निकम यास बाथरुमचा वास येत असून पाणी जास्त टाकत जा असे सांगितले. भावाच्या बोलण्याचा राग आल्याने रावसाहेब याने रागाच्या भरात दिपकच्या पोटावर, छातीवर सुर्‍याने गंभीर वार केले. यात दिपक गंभीर जखमी झाला. त्याला उपचारार्थ जळगावातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांनंतर 19 एप्रिल रोजी दिपकचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. पोलिसांनी मृत्यूपूर्वी नोंदविलेल्या दिपकच्या जबाबावरुन पाचोरा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल केला होता.
पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक नवलनाथ तांबे, सहाय्यक पोलीस निरिक्षक अविनाश आंधळे यांनी गुन्ह्याचा तपास केला. तपासाअंती पोलीस निरिक्षक धनंजय येरुळे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्या. एस.जी.ठुबे यांच्या न्यायालयात हा खटला चालला. यात प्रत्यक्षदर्शी मयताचा मुलगा, मयताचा पत्नी, वहिनी यांच्यासह डॉक्टर, तपासधिकारी असे एकूण 17 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीपुराव्याअंती न्या .ठुबे यांनी आरोपी रावसाहेब निकम यास दोषी धरुन जन्मठेप आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या एकूम रकमेपैकी 45 हजाराची रक्कम मयताची पत्नीस देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. सरकारपक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड. वैशाली महाजन यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून तुषार मिस्तरी, पाचोरा पोलीस ठाण्याचे केसवॉच समाधान पाटील यांनी सहकार्य केले.