‘माणूस’ निर्माणासाठी वाचन करणे महत्त्वाचे

0

पुणे । माणसातील ‘माणूस’ निर्माण करण्यासाठी वाचन महत्त्वाचे आहे. वाचनामुळे समस्यांकडे पाहाण्याची दृष्टी मिळते, उत्साह वाढतो, चांगले काम करण्याची उर्मी मिळते, अवातंर वाचनामुळे बुद्धीची वाढ होते. चांगले साहित्य वाचल्यावर आधीचा माणूस राहात नाही. वाचनामुळे जीवन संपन्न होते, असे विचार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केले.

डेकन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात आयोजित केलेल्या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करताना ‘वाचन संस्कृती आणि आजचा युवक’ या विषयावर डॉ. अवचट बोलत होते, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.डॉ. अवचट म्हणाले, प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चांगले दडलेले असते. ंपरंतु पैसा आणि उपभोगाच्या दडपणाखाली तो गेलेला असतो. त्याला बाहेर काढण्यासाठी वाचन महत्त्वाचे अांहे.मोबाईलच्या वापराने स्वतःचा स्वतःशी आणि इतरांशी संवाद कमी झाला आहे. तो वाढविण्यासाठी वाचन महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन केल्याची माहिती डॉ. रावळ यांनी दिली. उपप्राचार्य डॉ. जगदीश लांजेकर, डॉ. आशिष पुराणिक, डॉ. सुरेश वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. निशा घोरपडे यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

स्वतंत्र दालने
या प्रदर्शनात वि. स. खांडेकर, डॉ. आनंद यादव, शिवाजी सावंत, विश्वास पाटील, सुधा मूर्ती, ओशो, शांता शेळके, एम. एस. भैरप्पा आदी साहित्यिकांची स्वतंत्र दालने आहेत. याशिवाय अभ्यासासाठी अवांतर व पूरक साहित्य मांडण्यात आले आहे.