नैरोबी | एक कोटी तीन लाख वर्षापूर्वीची लहान माकडाची कवटी केनियामधील मानववंश शास्त्रज्ञांना सापडली असून त्यामुळे माणूस आणि माकडांचा सामाईक वंशज कसा दिसत हे समजणार आहे.
उत्तर केनियामध्ये एका उत्खननात कवटीचे अवशेष सापडले. जीवाश्म २०१४ मध्ये नापुडटमध्ये सापडले. माणूस आणि माकडांच्या उत्क्रांतीमधील मध्य मायोसिन कालावधी फार महत्वाचा मानला जातो. कवटीच्या जीवाश्मांमुळे या कालावधीवर प्रकाश पडणार आहे. नेचर या जर्नलमध्ये याबद्दल विस्तृत लिहीले आहे.
सापडलेली कवटी गिबनशी नाते सांगते. मात्र या जीवाश्माच्या कानांची नळी चिम्पांझी आणि माणसांप्रमाणे आहे. कवटीला किंवा या जीवाश्माला अलेझी असे नाव दिलेले आहे. अलेझीला मोठी मेंदुची पोकळी आहे. आताच्या माकडांपेक्षा ती मोठी आहे. कवटीला दातही आहेत. एक्स रे किरणांवरून केलेल्या प्रतिमेवरून अलेझी ही नवी जातकुळी असल्याचे लक्षात येत आहे. ७० लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत राहणाऱ्या चिम्पांजीशी माणसाचा संबंध जोडला जातो. आता मिळालेली कवटी १ कोटी वर्षापूर्वीची आहे. मायोसिन युगाचा कालावधी दोन कोटी ते पाच कोटी वर्षांपूर्वी हा होता. या दरम्यान माकडांमध्ये मोठे स्थित्यंतर झाले.
अलेझी एक कोटी वर्षापूर्वीचा आहे, असे इसैया नेन्गो हे तुरकाना बसिन संस्थेतील मानववंशशास्त्रज्ञ सांगतात. माणसाच्या आणि माकडांच्या पूर्वजाविषयी अलेझी माहिती देईलच पण सध्या तरी आपला आरंभबिंदू आफ्रिकाच आहे, असे वैज्ञानिक सांगत आहेत.