माणूस मोठा ताकदीचा, पण…

0

‘पाव्हणं रामराम… घ्या तमाकू, मळा अन् चुनाबी घ्या. बरं, काय म्हणतंय राजकारण? काय चाललंय गावात, शिवारात? काय म्हणत्यात नेते? तुमच्या पुढार्‍यांचं कसंय? पुढारी अन् तमाकू यावरून आठवलं- आपण कार्यकर्ते म्हंजी तमाकूच समजत्यात की नेते! तलप आली की मळायची, टाकायची तोंडात. जरूर असंल तवर चघळायची, गरज संपली की टाकायची थुकून…’

‘लोकसत्ता’ वर्तमानपत्र वाचत असताना बावीस-तेवीस वर्षांपूर्वी भेटलेला हा मजकूर, डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या ‘रामराम पाव्हणं’ या कॉलममधला. अधाशासारखा कॉलम वाचला. त्यानंतर दर आठवड्याला वाचत गेलो. या लेखकाविषयी मनात काही प्रतिमा साकारत गेली. त्याचा फोटो पाहिला. त्याची दाढी, डोक्यावरच्या केसांचा कोंबडा, खादीचा झब्बा. त्याच्या भाषेत भलताच दम जाणवला. गावातल्या पारावरची भाषा, लोकांच्या मनातले प्रश्न, त्यांच्या जिनगानीतले प्रसंग-उदाहरणं घेऊन या कॉलमात चर्चा होई. राजकारण, समाजकारण, शेती, धर्म, अर्थकारण, गावगाडा, स्त्री-पुरुष समता, शिक्षणव्यवस्था, गावच्या पाटलांची दादागिरी, टग्या राजकारण्यांची मनगटशाही- असे नाना प्रश्न. त्यांची चर्चा. डॉक्टर अत्यंत भेदक पद्धतीनं करत.

या लेखकाला भेटलं पाहिजे, असं मनात ठाम झालं. कॉलमच्या मजकुरात भेटलेले डॉक्टर पुढे पुण्यात शिकायला गेलो अन् जवळचे झाले. पुण्यात एस. पी. कॉलेजच्या समोर ‘सत्याग्रही विचारधारा’ मासिकाचं ऑफिस होतं. त्याचं नाव ‘क्रांतिनिकेतन’ ठेवलेलं. मोठं बोलकं नावं. चार मजले चढून डॉक्टरांना भेटायला जावं लागे. चार मजले चढून आलेल्याला डॉक्टर म्हणत, ‘हे चार मजले जो चढतो, तो निरोगी असल्याचं सर्टिफिकेट मी देतो!’

आपण माणसांचा डॉक्टर असल्याचं ते वारंवार सांगत. त्याचा त्यांना अभिमान असावा, हे जाणवायचं. डॉक्टरांकडे गेल्यावर त्या ऑफिसचे काही नियम दिसले. न सांगता ऑफिसातल्या मावशी प्रत्येकाला चहा देत. दुधाचा चहा मोठा रुचकर. गावाकडचा आहे, असं वाटे. चहा पिता-पिता डॉक्टरांचं बोलणं चालू. ते ऐकणं हा मोठा आनंददायी, विचार करायला लावणारा तरीही करमणुकीचा भाग असे. डॉक्टर या गप्पा-चर्चांमध्ये विविध विषय हाताळीत असत. इतिहास, तत्त्वज्ञान, उत्क्रांतीशास्त्र, सामाजिक विज्ञान, विकास, राजकारण, नेत्यांचे विचारविश्व, खेळ, आहार, स्त्री-पुरुष संबंध, लैंगिक जीवन, भांडवलशाही, समाजवाद, साम्यवाद, जडवाद, गांधीवाद, कादंबर्‍या, आत्मचरित्रं, चित्रपट, संपूर्ण क्रांती, खरं अध्यात्म, खरं वैराग्य, बुद्धाचा धम्म, महावीराचं तत्त्वज्ञान, चार्वाक, फुले-आंबेडकरवाद, जातिव्यवस्थेचं गौडबंगाल, गावगाडा, गावच्या पाटलांचे विचित्र मनोविश्व, घमेंडी पाटलांच्या गंमतीजमती, क्रौर्य, फजित्या… अशा नानाविध विषयांवर चर्चा चाले. वेळ-काळाचं भान हरपून डॉक्टर बोलत असत. हा अखंड विचारमहोत्सव असे. या महोत्सवाचा आपण भाग आहोत, ही जाणीव खूप सुखद असे. खूप माहिती मिळे. चर्चेनंतर आपण नवे झालोत, असं वाटे.

डॉक्टरांचा एक विशेष होता. त्यांच्यासमोर जसा माणूस येई, तसा ते त्याच्याशी संवाद साधत. अडचणीतला माणूस असेल, तर त्याच्याशी त्याच्या अडचणीपुरतं बोलायचं. शिक्षक-वकील असेल, तर त्याच्याशी त्यांच्या व्यवसायाविषयी. आमच्यासारखे कॉलेजातले विद्यार्थी पाहिले की, डॉक्टर अधिक मोकळे होत असावेत. डॉक्टर आपल्याशी मनमोकळं बोलतात, अखंड बोलतात- हा आम्हालाही सन्मान वाटे. दुपारी दोन वाजता भेटायला गेलेल्या आमच्याशी डॉक्टर रात्री आठपर्यंत चर्चा करत. ऑफिसात सकाळी दहा वाजता आलेले शेषराव, शीलवंत, दशरथ चव्हाण यांना याचा त्रास होई. ते आमच्यावर कधी कधी वैतागत. म्हणत, ‘तुम्हाला काही कामं नाहीत का रे?’ अर्थात् हे तिघेही इतर वेळी खूप प्रेमानं वागत. पण कधी कधी त्यांना या चर्चा, उशीर यांचा मन:स्ताप होत असावा.

एकदा डॉक्टर म्हणाले, चल येतोस का? उद्या मी राशीनला चाललोय, शाळेवर! पण लवकर निघावं लागेल. तू विद्यापीठातून सकाळी सात वाजताच घरी ये. मला आनंदच झाला. दिवसभर डॉक्टरांचा सहवास, घनघोर चर्चा, प्रवास अन् शाळा पाहणं. त्या वेळी डॉक्टरांची पांढरी अ‍ॅम्बॅसिडर कार होती. दशरथ ड्रायव्हर. सकाळी सात वाजता डॉक्टरांना जॉइन झालो. तेव्हा डॉक्टर संगमनेरी गायछाप तंबाखू खात. एकदा विडा तोंडात टाकला की, बोलू लागत.
राजा कांदळकर- 9987121300