मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी पुणे ते नागपूर आरक्षण क्रांती पदयात्रा

0

इंदापुर । मातंग समाजाची सध्याची आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक, सामाजिक व राजकीय परिस्थिती इतर समाजाच्या तुलनेत अत्यंत बिकट व हालाखीची आहे. समाजाच्या विविध मागण्या नागपूर अधिवेशनात मांडल्या जाव्यात यासाठी लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून पुणे ते नागपूर आरक्षण क्रांती पदयात्रा काढण्यात आली आहे. 20 डिसेंबरला या पदयात्रेचे रुपांतर विराट मोर्चात होणार असल्याची माहिती लहुजी शक्ती सेनाध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांनी इंदापूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रायबा मोहीते, सतिश सागर, ललेंद्र शिंदे, सुरेश मिसाळ उपस्थित होते.

मातंग समाजावर अन्याय
आरक्षणाच्या समान वाटप पद्धतीमुळे मातंग समाजावर झालेल्या अन्यायाविरूद्ध मातंग समाजाने आपली प्रतिक्रिया व्यक्त करीत असताना रस्त्यावर ऊतरून कधीही दगड हातात घेतलेला नाही. जाळपोळ, दंगल केलेली नाही. राजद्रोह तर कधीच केला नाही. शासनकर्त्यांनी मातंग समाजाच्या मागण्यांकडे डोळेझाक करू नये, यासाठीच पुणे ते नागपूर पायी पदयात्रा काढून 20 डिसेंबरला नागपूर येथे ऐतिहासीक मोर्चाचे आयोजन केले आहे. पदयात्रेच्या माध्यमातून प्रत्येक गावा-गावात, घरा घरात जाऊन मातंग समाज जनजागृती करीत 20 डिसेंबर रोजी विराट मोर्चाद्वारे पदयात्रेची नागपुरात सांगता होणार असल्याची माहिती कसबे यांनी दिली.

सत्ताधार्‍यांनी केली उपेक्षा
केंद्रातील सरकार असो की, राज्यातील सत्ताधारी सरकार असो किंवा विरोधी पक्ष असो, मातंग समाजाच्या मागण्यांविषयी कोणालाही देणे घेणे नाही. त्यामुळे समान न्यायाची भाषा करणार्‍या सत्ताधार्‍यांनी मातंग समाजाची उपेक्षाच चालविली आहे. देश स्वातंत्र्यासाठी मातंग समाजाला मोठी किंमत मोजावी लागली. या गोष्टीची जाण असल्याने, समता, स्वातंत्र्य व बंधुता या मूलभूत चौकटीमध्ये समाजाने आहे त्या स्थितीत स्वत:ला सामावून घेतले आहे, असे कसबे यांनी सांगितले.

मागण्यांकडे दुर्लक्ष
आरक्षण क्रांती पदयात्रेचे इंदापुरात सलामी देऊन स्वागत करण्यात आले. त्यावेळी पत्रकार परीषदेत घेण्यात आली. मागील अनेक वर्षांपासून लहुजी शक्ती सेना व राज्यातील इतर संघटना समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी लढत आहेत. प्रसंगी आंदोलने, मोर्चे, उपोषणे करून शासन दरबारी लढा देत आहेत. शासन मात्र आमच्या न्याय व हक्कांच्या मागण्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप कसबे यांनी यावेळी केला.