माता जिजाऊ यांची चुकीची माहिती छापणार्‍या पुस्तकावर बंदी आणावी

0

चाळीसगावी सामाजीक संघटनांची तहसिलदारांना मागणी

चाळीसगाव – लातुरच्या निकिता पब्लिकेशन अंतर्गत ‘संस्कृत सारिका’ या पुस्तकात राजमाता जिजाऊ मॉसाहेबांच्या विषयी चुकीचा मजकुर छापल्याने या पुस्तकावर बंदी आणावी राष्ट्रमाता जिजाऊंची बदनामी करणाऱ्या लेखक, प्रकाशक, वितरक व अभियानाचे प्रमुख या सर्वांवर महापुरूषांच्या बदनामी प्रकरणी सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी चाळीसगाव येथे सामाजीक संघटनांनी केली असुन १५ डिसेंबर रोजी तसे निवेदन तहसिलदार यांच्या मार्फत शिक्षणमंत्री उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय मुबंई यांना देण्यात आले आहे.

नायब तहसिलदार विशाल सोनवणे यांना रयत सेना, प्रगत संस्था, सह्याद्री प्रतिष्ठान, एकनाथराव खडसे विकास मंडळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील महाविद्यालयीन शिक्षणात अकरावीच्या संस्कृत विषयाच्या ‘संस्कृत सारिका’ नावाच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांची वंशावळ दाखवली आहे. ‘महाराजस्य’ या वंशावळीत राष्ट्रमाता जिजाऊ यांना छत्रपती शिवाजी महाराजांची ‘पत्नी’ दाखवले आहे. कोणीही उठुन महापुरूषांची बदनामी करावी छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. रयतेचे त्याच स्वराज्यात ज्यांनी इतिहास घडविला त्यांचाच अपमान केला जातो जिजाऊ मॉसाहेबानी महाराष्ट्राला संस्कार दिले. आईला आई बहीणीला बहीण म्हणायचे रयतेला शिकविले त्याच महाराष्ट्रात राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा अपमान शिवप्रेमी कदापि सहन करणार नाही.

लातुरच्या निकिता पब्लिकेशन अंतर्गत ‘संस्कृत सारिका’ हे पुस्तक राजेंद्र शास्त्री (गायकवाड) यांनी लिहिलेले आहे. हे संस्कृत विषयाचे अतिशय वादग्रस्त पुस्तक आहे त्यांनी केलेले लिखाण अत्यंत खोटारडे व वादग्रस्त आणि इतिहासाचा विपर्यास करणारे आहे. तरी “संस्कृत सारिका” हे पुस्तक तात्काळ रद्द करावे व संबंधित पुस्तकात राष्ट्रमाता जिजाऊंची बदनामी करणार्‍या लेखक, प्रकाशक, वितरक व अभियानाचे प्रमुख या सर्वांवर महापुरूषांच्या बदनामी प्रकरणी सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा असे न झाल्यास शिवप्रेमीचा उद्रेक झाल्यास राज्यात कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण झाल्यास यास लेखक, प्रकाशक, वितरक व अभियानाचे प्रमुख व शासन प्रशासन जबाबदार राहील असा ईशारा देण्यात आला आहे. यावेळी रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, नाथाभाउ विकास मंडळाचे अरुण पाटील, प्रगत संस्थाचे खुशाल पाटील, सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे यांच्यासह सुर्यकांत कदम आदी उपस्थित होते.