माता न तू वैरिणी!

0

पांगोळीत आईने पोटच्या गोळ्याला फेकले विहिरीत

लोणावळा : एका आईने आपल्या अडीच महिन्याच्या चिमुरड्याला विहिरीत फेकून देत त्याची हत्या केल्याची संतापजनक घटना लोणावळ्यातील पांगोळी गावात शुक्रवारी पहाटे घडली. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात त्या महिलेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शीतल दत्रात्तय भांगरे, असे त्या निर्दयी आईचे नाव असून, ती मनोरुग्ण असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पांगोळी शीतलचे माहेर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल हिचे दीड वर्षापूर्वी उर्से गावातील दत्तात्रय भांगरे यांच्याशी लग्न झाले होते. आठवडाभरापूर्वी शीतल ही तिचा अडीच महिन्याचा मुलगा शंभू याच्यासह माहेरी पांगोळी येथे आईकडे राहायला आली होती. शंभू हा जन्मत:च अशक्त होता. त्यामुळे शीतलने त्याला शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीत फेकून देत त्याची हत्या केली. याप्रकरणी शीतलचा पती दत्तात्रय भांगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शीतलविरुद्ध लोणावळा शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल झाला.

अशी उघडकीस आली घटना
सकाळच्या सुमारास शंभू यास गुंडाळून ठेवलेले कापड विहिरीतील पाण्यावर तरंगताना दिसून आले. त्यावरून गावातील लोकांना संशय आला. त्यानंतर या घटनेची माहिती लोणावळा शहर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी लागलीच धाव घेत पांगोळी ग्रामस्थांसह विहीर तसेच आजूबाजूच्या परिसरात शंभूच्या मृतदेहाचा शोध घेतला. परंतु, तो मिळून आला नाही. शेवटी पोलिसांनी शिवदुर्ग मित्र बचाव पथक व आय.एन.एस. शिवाजीच्या पाणबुड्याला पाचारण केले. पाणबुड्याने सायंकाळी सातच्या सुमारास बाळाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.