निर्घृण खुनाने पुणे हादरले; आरोपी मुलगा मनोरुग्ण?
पुणे : आई-वडील गाढ झोपेत असताना आईची दोरीने गळा आवळून तर वडिलांची चाकुने गळा कापून थंड डोक्याने हत्या केल्यानंतर क्रूर मुलगा घरातील सोफ्यावरच गाढ झोपी गेला. त्याने नस कापून आत्महत्येचाही प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. ही धक्कादायक घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास पुण्यातील शनिवार पेठेत घडली. विश्रामबाग पोलिसांनी याप्रकरणी पराग क्षीरसागर यास अटक केली आहे. प्रकाश क्षीरसागर (वय 60) व आशा प्रकाश क्षीरसागर (वय 55) रा. पाटे हाईट्स शनिवार पेठ, पुणे अशी हत्या करण्यात आलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. परागने अत्यंत थंड डोक्याने आईवडिलांचा खून केला. पहाटे पाचच्या सुमारास पराग आईवडिल झोपतात त्या खोलीमध्ये गेला, त्याने पहिल्यांदा प्रकाश यांचा गळा चिरून हत्या केली, आईने आरडाओरडा करायला सुरुवात केल्याने परागने तिचाही गळा कापला. दोन खून केल्यानंतर पराग रक्ताने माखलेल्या कपड्यांनिशी हॉलमध्ये असलेल्या सोफ्यावर झोपला.
रक्ताच्या थारोळ्यात पडले होते मृतदेह
परागची वहिनी जेव्हा सकाळी उठली तेव्हा तिला हॉलमध्ये रक्ताने माखलेल्या कपड्यांवर झोपलेला पराग दिसला, रक्ताचे फराटे आणि ओघळ बघून ती सासूसासर्यांच्या खोलीत गेली, तेव्हा ती उभ्या उभ्याच थिजून गेली. प्रकाश आणि आशा यांचे मृतदेह त्यांच्या खोलीत बेडवर पडलेले होते. सुनेने तातडीने पोलिसांना फोन केला. पोलिस जेव्हा क्षीरसागर यांच्या घरी पोहोचले तेव्हाही पराग झोपलेला होता. पोलिसांना बघताच तो शांतपणे त्यांना शरण गेला, परागला पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली आहे. प्राथमिक तपासामध्ये परागचे त्याच्या आईवडिलांसोबत सतत खटके उडत होते, या वादातूनच त्याने या हत्या केल्या असाव्यात असा संशय आहे. पराग हा इजिनिअर असून, तो बेकार होता असेही कळाले आहे.
आरोपी मुलगा मानसिक रुग्ण!
मिळालेल्या माहितीनुसार, पराग हा मानसिक रुग्ण आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मानसिक रुग्ण असल्याने त्याचे लग्न झालेले नाही. मिळेल तिथे बिगारी अथवा अन्य कामे तो करतो. गेल्या काही दिवसांपासून त्याचे वर्तन आणखी बिघडले होते. मंगळवारी (6 डिसेंबर) सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास त्याने आईवडिलांची हत्या केल्यानंतर त्याने स्वतःच्या हातावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, यातून तो बचावला. घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी परागला ताब्यात घेतले व उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल केले होते.