माती अन् नात्यांशी फारकत; संवेदनशीलतेची असंवेदनशीलतेकडे वाटचाल!

0

या आठवड्यात तीन बातम्या वाचण्यात आल्यात. समाजाचे त्या बातम्यांकडे फारसे गांभीर्याने लक्ष गेलेले नाही. गुजरातमधील राज्यसभा निवडणूक, मुंबईतील मराठा मोर्चा आणि डोकलाम सीमेवर निर्माण झालेला तणाव यासारख्या मुद्द्यांकडे प्रसारमाध्यमांचे जरा जास्तच लक्ष केंद्रीत झाल्याने खरे तर या बातम्यांकडे मीडिया आणि समाज असे दोघांचेही दुर्लक्ष झाले असावे, असे वाटते. या बातम्या अशा होत्या.
1) अमेरिकेहून घरी परतलेल्या मुलाला दिसला आईचा सांगाडा.
2) एकेकाळचे कोट्यधीश झाले बेघर, रेमंडचे विजयपत सिंघानियांची करुण अवस्था
आणि तिसरी बातमी ही तशी नियमित वाचण्यातली असली तरी, तिचे कारुण्य मानवी वेदना वाढविणारेच होते. ती बातमी होती,
3) बापाच्या आत्महत्येच्या चिंतेने लेकीनेच मृत्यूला कवटाळले!
या बातम्यांतून काय दिसून येते? भारतीय समाज आणि येथील व्यवस्था अशा एका वळणावर उभी आहे, की जेथे माणुसकी, मानवता आणि नाते यांचा कधीही कडेलोट होऊ शकतो. आज लोंढेच्या लोंढे ग्रामीण भागातून शहराकडे धाव घेत आहेत. अनेक गावे ओस पडली असून, शहरात माणसे तुंबली आहेत. गावाकडे रोजगार नाही हे एक प्रमुख कारण, दुसरे शहरी जीवनाची ओढ आणि तिसरे शेतीपेक्षा नोकरी बरी ही मानसिकता या परिस्थितीला कारणीभूत आहे. शहरात आलेली ही माणसे, माणसे राहात नाहीत ती जनावरे बनून जातात. गावाच्या मातीत माणुसकी नावाचे तत्व असते. एकमेकांबद्दल आपुलकी असते. तुम्ही जन्मल्यापासून ते मरेपर्यंत एकमेकांना पाहात असता, अनुभवत असता. त्यामुळे दोन माणसांत एकोप्याची एकमेकांच्या सुख अन् दुःखात समरूप होण्याची भावना निर्माण झालेली असते. एकत्र शाळेपासून ते लग्नकार्य, मुलेबाळे होणे आणि नंतर म्हतारे होण्यापर्यंतचा आयुष्यातील सर्व प्रवास ही माणसे एकमेकांच्या सोबतीने करतात. त्यामुळे त्यांच्यातील नाते हे रक्तापेक्षाही घट्ट अन् वेगळे निर्माण झालेले असते. तेथे जाती असतील परंतु त्या जातीला कृत्रिम भिंती नसतात. कुणी कुणाला उपाशीपोटी पाहू शकत नाही, सुखदुःखाचा सामना करताना सगळे गाव धावून येते. गावाची माती अन् शहराच्या मातीत हाच महत्वाचा फरक आहे. गावाच्या मातीला नाती चिकटलेली असतात. ती नाती आयुष्यात प्रत्येक वळणावर उजवी ठरतात. शहराच्या मातीला ना गंध असतो ना नाती असतात. कृत्रिम, बोजड आणि नाटकी नाते निर्माण करणारी ही माती असते. त्यात मायेचा ओलावा नसतो, म्हणून अगदी समोरच्या फ्लॅटमध्ये कुणी निर्वतले तरी त्याचे सोयरसुतक बाजूच्या फ्लॅटमध्ये राहणार्‍याला नसते. कुणाच्या सुखदुःखातही कुणी सहभागी होत नाही, कोरडी का होईना पण कुणी कुणाची विचारपूस करत नाही. शहरातील जीवन प्रचंड धावपळीचे झाले असून, माणसे पैशाच्या मागे नुसती पळू लागली आहेत. पैशाने सारी सुखे मिळविता येतात या भ्रमात प्रत्येकजण आहे. त्यामुळे पैसा मिळविण्याच्या नादात ते आई-वडिलांनाच काय; परंतु त्यांना स्वतःचाही विसर पडू लागला आहे.

पहिली बातमी वाचण्यात आल्यानंतर बोजड संवेदनहिनतेच्या माणसांबद्दल कणव आणि तिरस्कार अशा दोन्ही भावना दाटून आल्यात. मुंबईतील ओशिवरासारख्या उच्चभ्रू वसाहतीत राहात असलेल्या एका 65 वर्षाच्या वृद्धेचा एकुलता एक मुलगा अमेरिकेत डॉलरमध्ये कमाई करतो. तो तिकडे बायको-मुलांसह आनंदात राहतो. आणि, इकडे ही म्हतारी एकटी राहात होती. आशा साहानी नावाची ही म्हतारी मरून पडते तरी तिला कुणी उचलत नाही. ती सडून-कुजून जाते, नुसता तिचा सांगाडा उरतो, तरी कुणाला त्याची जाणिवही होत नाही. दीड वर्षानंतर जेव्हा मुलगा घरी येतो तेव्हा दरवाजा वाजवूनही आई तो उघडत नाही म्हणून तो बनावट चावीने दरवाजा उघडून घरात प्रवेश करतो; तर त्याला आईचा पलंगावर पडलेला सांगाडा दिसतो. आता प्रश्‍न असा निर्माण होतो की, अमेरिकेत चांगला आयटी इंजिनिअर असलेला आणि काही लाखांच्या घरात पगार घेणार्‍या या मुलाला आईची एकदाही आठवण आली नसेल का? त्याला आईला फोनही करावा वाटला नसेल का? पैशाच्या धुंदीत असा काय हा व्यस्त झाला होता, की आई मेली तरी त्याची जाणिव त्याला होऊ नये. नाती संपुष्टातच आली नाही तर गळून पडली आहेत, याचा हा जीवंत पुरावा म्हणावा लागेल. बरं, ही म्हतारी जर गावाकडे असती तर गावाने तिला अशी सडून मरू दिली असती का? आजही गावात अशा शेकडो म्हतार्‍या-कोतार्‍या आहेत ज्यांची मुलंबाळं नोकरी-धंद्यानिमित्त शहरात असतात. त्या एकट्याच आपल्या कुडामातीच्या घरात राहतात. परंतु, गावात कुणी तरी त्यांना आजी म्हणणारे असते, गावात कुणी तरी तिला दररोज जेवली का? विचारणारे असते. म्हतारी कुठे दिसली नाही तर घरात डोकावून पाहणारे असते. एखादी चिंगी-मंगी तिच्याजवळ सांभाळण्यास सोडून कुणाची तरी सुन शेतात गेलेली असते. त्या चिंगी-मंगीला खेळवण्यात, तिची नातवागत शी-सू करण्यात त्या म्हतारीचे दिवस निघून जातात. आता ओशिवरासारख्या उच्चभ्रू वसाहतीत, पोटी श्रीमंत औलाद असलेल्या आशा साहानी या एखाद्या खेड्यात असत्या तर त्या अशा सडून मेल्या असत्या का? या प्रश्‍नाचे उत्तर सरळ सरळ ‘नाही’ असेच येईल! मग् ती श्रीमंती काय कामाची? एकुलत्या एक मुलाचा काही लाखातील पगार काय कामाचा? शहरातील नाती अशी आपलेपणाला पोरकी झाली असून, त्यापेक्षा गावकुसातील परकी माणसेही आपलीच वाटत असतील तर ती गावातील माती ही कधीही चांगली!

दुसरी बातमीही अशाच मानवी भावभावनांना ठेच पोहोचवणारी आहे. कापड उद्योगातील नामांकित ब्रॅण्ड असलेल्या रेमंड लिमीटेडचे मालक आणि देशातील श्रीमंत घराण्यामध्ये ज्यांचे अत्यंत आदराने नाव घेतले जाते, त्या विजयपंत सिंघानियांवर आता दोनवेळच्या अन्नालाही मोताद होण्याची वेळ आली आहे. दक्षिण मुंबईतील ग्रॅण्ड पराडी सोसायटीत ते भाड्याच्या घरात राहात असून, त्या घराचे भाडेही त्यांना भरता येत नाही. दोनवेळचे जेवणही त्यांच्या नशिबी नाही. संपूर्ण आयुष्य ज्या माणसाचे ऐषोआरामात काढले, त्यांना आता शेवटच्या टप्प्यात अशाप्रकारे हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगावे लागत आहे. स्वतःच्या पोटच्या मुलानेच त्यांच्यावर ही दुर्देवी वेळ आणली. पैसा म्हणजे सर्वस्व आणि तो एकदा बापाकडून मिळविला की, आपले बापाप्रती काहीच उत्तरदायित्व राहात नाही, असे समजणार्‍या नालायक पिढीने आणलेली ही दुर्देवी वेळ आहे. गौतम सिंघानिया हा विजयपत यांचा मुलगा. बापाने मोठ्या विश्‍वासाने हजार कोटी रुपयांची संपत्ती त्याला अगदी आयती दिली. ही संपत्ती निर्माण करण्यासाठी 78 वर्षीय बापाची संपूर्ण हयात गेली. उत्तम व गुणवत्तापूर्ण व्यापारातून ही संपत्ती निर्माण झाली होती. म्हणतात ना, नारळ अन् मुलगा कसा निघेल सांगता येत नाही! तसेच उद्योगपती सिंघानिया यांच्याबाबतीत घडले. पोटी कुपुत्र जन्माला आला अन् नशिबाचे फेरे उलटे पडले. आयुष्याची संध्याकाळ झाली असताना त्यांना खडतर अन् हलाखीच्या आयुष्याला सामोरे जावे लागत आहे. हे काही कर्माचे भोग नाहीत, तर कुपुत्रामुळे नशिबी आलेले वाईट दिवस आहेत. परंतु, काळ हा चमत्कारिक असतो, आज जी परिस्थिती विजयपत सिंघानियांवर आली तीच परिस्थिती त्यांचा कुपुत्र गौतम सिंघानियावर येणार नाही हे कशावरून? जसे करावे तसे भरावे लागते, याची जाणिव कदाचित गौतम सिंघानियांना नसावी. उभे आयुष्य व्यापार अन् पैसा कमाविण्यात घालताना, त्यायोगे लाखो कुटुंबाचे संसार उभे करताना विजयपत सिंघानियासारख्या उद्योगपतीला आपण मुलावर काही चांगले संस्कार करत आहोत की नाही? याचा विसर पडला असावा. किंवा, उत्तम संस्कार अन् शिक्षण देऊनही गौतम हा बिघडला कसा? हादेखील प्रश्‍नच आहे. परंतु, अब्जाधीशांच्या आयुष्यात आलेला हा दुर्देवी प्रसंग प्रत्येकाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे. पुढच्यास ठेच मागचा शहाणा या उक्तीप्रमाणे प्रत्येकाने आता शहाणे होण्याची गरज आहे. मुलांना शिक्षण, संस्कार देताना त्यांच्यात नात्यांचा ओलावाही निर्माण करावा लागणार आहे. घरगुती संस्कारापेक्षाही सामाजिक संस्कार मोठे असतात. गौतम अशा समाजात वाढला, मोठा झाला, अन् वावरला, ज्या समाजात पैसा आणि पैसा हाच एकमेव धर्म आहे. तो जर आई-वडिलांच्या पायाजवळ स्वर्ग पाहणार्‍या समाजात वावरला असता तर कदाचित आजची दुर्देवी वेळ विजयपत सिंघानियांसारख्या ज्येष्ठ उद्योगपतीवर आली नसती. गावकुसात हे सामाजिक संस्कार अगदी फुकट मिळतात. शहरी आणि उच्चभ्रू वसाहतीत हे संस्कार औषधालाही शिल्लक नाहीत. मोठ्या माणसांना माघारी किंवा उलटून बोलले तरी गावात कुणीही कानफटात वाजवतो. त्यात एक धाक असतो, एक संस्कार जडविण्याची कृती असते.

तशी कृती कुणी शहरात करत नाही, मग् मोठ्या माणसांबद्दल संस्काराची शिदोरी कुणालाही मिळत नाही. या संस्काराच्या शिदोरीअभावीच गौतम सिंघानियांसारखे कुपुत्र घडत जातात. विजयपत सिंघानियांना दोष नाही, दोष हा सामाजिक संस्काराचा आहे. पैसा हे सर्वस्व मानणार्‍या पैसेवाल्यांनी हे लक्षात ठेवावे. आज विजयपत सिंघानियांवर ही दुर्देवी वेळ आली तरी उद्या कुणावरही येईल!

शेतकरी अन् शेतकरीपुत्रांच्या आत्महत्यांवरून ज्यांच्या भावना बोथट झाल्या आहेत, अशा समाजाला तिसर्‍या बातमीबद्दल फारसे अप्रूप नसेल. त्यातील कारुण्य, दारिद्य्र आणि जगाच्या पोशिंद्याला काय परिस्थितीला सामोरे जावे लागते, त्याबद्दलही कुणाला काहीच देणेघेणे नसेल. यांना कितीही द्या, तरीही यांचे रडगाणे चालूच असते, असे समजणार्‍या शहरी व नोकरदार माणसांना या तिसर्‍या बातमीबद्दल अजिबात नवल नाही, याची जाणिव असतानाही या बातमीतील वेदनेचा उहापोह मी येथे करत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबाच्या नशिबात काय वाढून ठेवले आहे, याबद्दल आता प्रत्येकाने संवेदनशील व्हायलाच पाहिजे. सत्तेवर आलेले कोणतेही राज्य सरकार शेतकरीप्रश्‍नी गंभीर नाही. शेतकरी आत्महत्या हा मुद्दा आता चघळून चोथा झालेला आहे. गावातील माणसे पटापट गळ्यात फास लावून घेत असताना अगदी गावखेड्यातही त्याबद्दल कुणाला हळहळ वाटेनाशी झाली आहे. आज त्याच्यावर उद्या आपल्यावर गळफास लावण्याची वेळ येणारच आहे, असे प्रत्येकाला वाटू लागले आहे. शहरी माणसांना तर याबाबत काहीच सोयरसुतक वाटत नाही. उलटपक्षी आम्ही टॅक्स भरतो, कर्ज काढून घर चालवितो अन् शेतकरी असल्याच्या नावाखाली ही माणसे प्रत्येकवेळी कर्जमाफीची बोंब ठोकतात. कर्जमाफी पदरात पाडून घेतात, एवढे देऊनही गळ्याला फास लावून मरून जातात, अशी टाकीही ही शहरी माणसे करत असतात. परवाचीच बातमी होती, शेतकरी असलेले वडील कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करतील या भीतीने परभणी, तालुका पाथरी येथील एका 17 वर्षांच्या मुलीने आपले जीवन संपवले. शेतातील पीक जळून गेल्याने 5-6 दिवसांपूर्वीच तिच्या काकांनी आत्महत्या केली होती. वडिलांचेही पीक पूर्णपणे खराब झाले आहे. आपल्या लग्नाच्या खर्चाच्या चिंतेने आता वडीलही आत्महत्या करतील या भीतीने ही मुलगी मरणाला सामोरे गेली. सारिका झुटे असे तिचे नाव. मुंबईवर मराठ्यांनी केलेल्या चढाईचे, अतिविराट मराठा मोर्चाचे कवित्व सुरु असतानाच, दूर तिकडे मराठवाड्यात ही घटना घडत होती. राज्य सरकार कर्जमाफीचा गाजावाजा करत असतानाच, अन् शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा मराठा मोर्चाच्या मागणीत ऐरणीवर असताना राज्यात शेतकरीच नव्हे तर आता त्यांची मुलेसुद्धा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू लागली आहेत, हे स्पष्ट करणारी ही दुर्देवी घटना आहे. शेतकरी बापाने आत्महत्या केली तर एक लाख रुपये मिळतात. त्यांच्या लेकीबाळीने आत्महत्या केली तर फुटकी कवडीही मिळत नाही, उलट पोटची लेक गेल्याचे दुःख आयुष्यभर त्या अभागी बापाला सलत राहाते. त्यामुळे जी कथित तज्ज्ञ आणि शहरी मंडळी शेतकरी एक लाखाच्या मदतीसाठी आत्महत्या करतात, असा गळा काढतात, त्यांनी शेतकरी मुलांच्या आत्महत्यांकडे डोळे उघडे ठेवून पहावे. त्यांच्यावर जी दुर्देवी वेळ आली त्याबद्दल थोड्या तरी आपल्या लेखण्या झिजवाव्यात. दोन-चार तज्ज्ञांमध्ये, समाजातील परिणामकारक घटकांमध्ये आपल्या व्याख्यान किंवा भाषणात हा मुद्दा थोड्याफार पोटतिडकीने मांडावा. शेतकर्‍यांबद्दल कुणालाही खरा कणवळा नाही. तो जगतो काय, अन् मरतो काय? त्याची चिलीपिल्लीही जगतात काय अन् मरतात काय? कुणालाही मग् ते सरकार असो, राजकारणी असो, बुद्धिजीवी असोत किंवा नोकरदार असोत, कुणालाही त्याबद्दल आस्था नाही. त्याच्या भरवशावर राजकारण उत्तम चालते, या भ्रमात राजकीयवर्ग मश्गूल आहेत. काल बाप आत्महत्या करत होता, आता त्यांची लेकबाळ आत्महत्या करत आहे. आत्महत्यांचे हे लोण महाराष्ट्राला शोभणारे आहे का? सत्ताधार्‍यांना या आत्महत्यांबद्दल थोडी तरी लाज वाटावी. कुणा कुणाच्या आत्महत्या सरकारला हव्या आहेत? सामाजिक संवेदना किती बोथट अन् मरणप्राय झाल्या आहेत हे ठसठशीतपणे मांडणार्‍या या घटना आहेत. त्या बातम्यारुपाने फार छोट्या प्रमाणात, काहीशा उपेक्षित स्वरुपात प्रसारमाध्यमांनी मांडल्या असल्या तरी, त्यामुळे त्यांची सामाजिक तीव्रता कमी होत नाही. ज्यांना मन आहे, भावना आहे, मुळात जे माणूस म्हणून जगतात, त्या माणसांना या बातम्यांमागचे कटू वास्तव अस्वस्थ करून गेले आहे.
पुरुषोत्तम सांगळे – 8087861982