मातृभूमी व शारदा गणेश मंडळ ठरले विजेते

0

भुसावळ । गणेशोत्सवात भुसावळात सर्वाधिक डीजेचा वापर झाल्याने पोलिसांना नाईलाजास्तव गुन्हा दाखल करावा लागला मात्र आगामी नवरात्रोत्सवात सुधारण्याची संधी समजून पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी येथे केले. शहर व बाजारपेठ पोलीस ठाण्यातर्फे नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवातील उत्कृष्ट सामाजिक देखावे व मिरवणूक सादर करणार्‍या मंडळांच्या पदाधिकार्‍यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शहर हद्दीतील शारदा गणेश मंडळ तर बाजारपेठ हद्दीतील जय मातृभूमी मंडळाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

नीलोत्पल भुसावळचे सिंघम -नगराध्यक्ष
सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी आगामी नवरात्रोत्सवात मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले. पोलिसांची कुणाही मंडळाविरुद्ध भूमिका नाही मात्र नियमांचे उल्लंघण करणार्‍यांची खैर नाही, असे सांगत त्या मंडळाचा डीजे 15 दिवस उलटूनही सुटला नसल्याची माहिती दिली. नगराध्यक्ष रमण भोळे यांनी भुसावळात नीलोत्पल यांच्यासारख्या डॅशिंग अधिकार्‍यांमुळे कायदा-सुव्यवस्था अबाधीत राहण्यास मदत झाल्याचे सांगत त्यांच्या कार्याचा गौरव केला. पोलीस यंत्रणेवर ताण न येण्यासाठी पदाधिकार्‍यांनी सहकार्याची भूमिका ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले. व्यासपीठावर तहसीलदार विशाल नाईकवडे, बाजारपेठचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे आदींची उपस्थिती होती.

सामाजिक प्रबोधन (देखावे) उत्कृष्ट मंडळ असे
शहर हद्द- प्रथम- शारदा गणेश मंडळ, द्वितीय- समता गणेश मंडळ, तृतीय- ओम साई सार्वजनिक मंडळ. बाजारपेठ हद्द- प्रथम- जय मातृभूमी मंडळ, द्वितीय- जय गणेश फाऊंडेशन, तृतीय- अष्टभूजा गणेश मंडळ. मिरवणुकीत उत्कृष्ट आरास सादर केल्याने जय गणेश फांऊडेशन, सिंधी राजा व शिवमुद्रा या मंडळाच्या पदाधिकार्‍यांचा गौरव करण्यात आला.