मातृ-पितृछत्र हरपलेल्या बालकांना मिळणार शासकीय छत्र

0

यावल। तालुक्यात मातृ-पितृछत्र हरपलेल्या ‘अनाथ’ बालकांना ‘आधार’ देण्याचे काम निराधार योजनेतून यावलमध्ये झाले आहे. तालुक्यात प्रथमच अशा प्रकाराच्या सहा प्रकरणांना नुकत्याच झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. ही बालके 25 वर्षांची होईपर्यंत त्यांना अनुदान दिले जाणार आहे. यावल तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची तहसील कार्यालयात बैठक पार पडली.

तहसिल कार्यालयात घेण्यात आली बैठक
त्यात एकूण 300 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. तहसिल कार्यालयात नुकत्याच झालेल्या या बैठकीत समितीसमोर तालुक्यातील मातृ-पितृछत्र हरपलेल्या अनाथ मुलांची सहा प्रकरणे ठेवण्यात आलेली होती. शासन निर्देशांचा सखोल अभ्यास करत तहसीलदार कुंदन हिरे, योजना समितीचे अध्यक्ष विलास चौधरी, सदस्य संजय भालेराव, प्रभाकर बंडाळे, प्रकाश सोनवणे योजनाचे नायब तहसीलदार संजय समदाने यांनी या सहा प्रकरणांना मंजुरी दिली.

संगोपनाला हातभार लागणार
विविध बर्‍याच शहरांसह ग्रामीण भागामध्ये मातृ पितृ क्षत्र हरपलेली बालके आपल्या मुलभूत हक्कांपासून वंचित राहतात. त्यांचे योग्य संगोपन न झाल्यामुळे ते वाम मार्गाला लागून त्यांचे संपुर्ण आयुष्य उध्वस्त होत असते. त्यामुळे शासनाने अशा प्रकारे अनुदान देऊन निराधारांना आधार देण्याचे काम केले आहे.

दरमहा 600 रुपये अनुदान
मंजुरी मिळालेल्या ठरावानुसार ही मातृ- पितृ क्षत्र हरपलेली बालके 25 वर्षे वयाची होईपर्यंत त्यांना शासनाकडून दरमहा 600 रुपये अनुदान मिळेल. तालुक्यात या प्रकारचे अनुदान प्रथमच देण्यात येणार आहे. दरम्यान, संपूर्ण बैठकीत 177 प्रकरणांना मंजुरी, तर त्रुटी आढळलेली 123 प्रकरणे पूर्ततेसाठी मंडळाधिकारी, तलाठी वर्गाकडे पाठवण्याचा निर्णय झाल्याचे नायब तहसीलदार समदाने यांनी सांगितले. या संदर्भात असलेल्या विविध शासकीय नियमांचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर या मुलांना लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. खर्‍या गरजूंना लाभ मिळून जीवन जगणे सुसह्य व्हावे, हाच योजनेचा उद्देश आहे. हा उद्देश पूर्ण व्हावा यासाठी नियमांचा अभ्यास करून तालुक्यातील सहा निराधार बालकांना लाभ मिळणार आहे.