शेतकर्यांच्या आत्महत्या आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्यात आग भडकली आहे. सरकारमधील मित्रपक्षांनीही त्याविरोधात दंड थोपटल्याने भाजप सरकारची कोंडी झाली आहे. एकीकडे या कोंडीतून मार्ग काढण्याची धडपड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करीत असतानाच, दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी या आगीत तेल ओतण्याचा प्रकार केला आहे. दानवेंनी शेतकर्यांविषयी काढलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळे शेतकर्यांमध्ये तीव्र संताप उमटला आहे, तर शेतकरी कर्जमुक्ती आणि जीएसटीच्या मुद्द्यावरून शिवसेनेनेही भाजपविरोधात दंड थोपटले आहे. त्यामुळे सेनेला चाप लावण्यासाठी मुंबईतील नालेसफाईतील घोटाळा आणि स्वतंत्र प्राधिकरण स्थापण्याची मागणी भाजपने लावून धरली. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजप सरकारच्या कोंडीत भर पडत असली, तरी शिवसेना-भाजपमधील शह-काटशहचे राजकारण सुरूच असल्याचे दिसून येत आहे.
शेतकर्यांच्या आत्महत्येचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, भाजप सरकारची संवेदनशीलता अजूनही जागी होत नाही. त्यातच भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकर्यांविषयी काढलेले वक्तव्य हे शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे. दानवेंच्या बेताल वक्तव्यामुळे त्यांची प्रतिमा मलीन झालीच आहे, पण भाजपचीही प्रतिमा त्यांनी मलीन केली आहे. दानवे हे स्वत:ला शेतकर्याचा मुलगा समजतात. मग ते शेतकर्यांविषयी अशा प्रकारचे वक्तव्य कसे काय काढू शकतात. पण या गर्भश्रीमंत शेतकर्याच्या मुलाचा लग्नाचा शाही थाट काही दिवसांपूर्वी सगळ्यांनीच पाहिला. पार्टी विथ डिफरन्सचा नारा देणार्या दानवेंच्या मुलाच्या लग्नासाठी तब्बल दीड लाख लग्नपत्रिका छापण्यात आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी दानवेंनी शेतकर्यांच्या आत्महत्या थांबत असतील, तर यासाठी सर्व विरोधकांनी एकत्रित येऊन राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, असा प्रस्ताव द्यावा अशा प्रकारचे वक्तव्य करून वाद ओढवून घेतला होता. काही महिन्यांपूर्वी भाजपचे आमदार प्रशांत परिचारक यांनीही सैनिकाविषयी अपमानास्पद वक्तव्य काढले होते. त्याचेही तीव्र पडसाद राज्यभर उमटले होते, तर अधिवेशन काळात भाजपचे आमदार अनिल गोटे यांनीही विधान परिषदेच्या वरिष्ठ सभागृहाबद्दल वारंवारपणे अवमानकारक वक्तव्य केले होते.
आघाडी सरकारच्या काळात पाणीटंचाईच्या मुद्द्यावर अजित पवार यांनीही बेजबाबदारपणे वक्तव्य केलं होतं. त्यामुळे सत्ता आली की लोकप्रतिनिधींना सत्तेची मस्ती चढते का? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या मनात उपस्थित झाल्यास तो चुकीचा कसा ठरू शकतो. सार्वजनिक जीवनात काम करीत असताना, प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपल्या जबाबदारीचे भान ठेवणे गरजेचे आहे. दानवेंच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर दानवे यांनी शेतकर्यांची माफी मागितली, पण एकदा तोंडातून सुटलेला शब्द हा बाणासारखा असतो. कितीही माफी मागून त्याची जखम भरत नाही. त्यामुळे शब्द जपून वापरावेत हे दानवेंसारख्या ज्येष्ठ लोकप्रतिनिधींना माहीत नाही अशातला भाग नाही. पण सत्तेची मस्ती म्हणतात ती हीच असते. दानवेंच्या या वक्तव्याचा निषेध राज्यभर करण्यात आला, विरोधी पक्षांनी केलाच. पण मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही केला. शेतकर्यांच्या प्रश्नावर आक्रमक झालेल्या शिवसेनेने मराठवाडा शिवसंपर्क अभियान राबवून निवडणुकीची मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. आता गाफील राहायचे नाही असाच ठाम निश्चय शिवसेनेने केलाय असल्याचे स्पष्ट होत आहे. शेतकर्यांच्या कर्जमुक्तीचा मुद्दा लावून धरला असतानाच आता जीएसटीच्या मुद्द्यावरून भाजपला कोंडीत पकडण्याची खेळी शिवसेनेने केली.
मुंबई महापालिका हा शिवसेनेचा प्राण आहे. त्यामुळे महापालिकेचे सात हजार कोटी उत्पन्न कमी झाले, तर त्याचा फटका शिवसेनेला बसणार आहे. त्यामुळे नुकसानभरपाईची मागणी सेनेने लावून धरली. जीएसटीच्या मुद्द्यावर सेनेने कडक भूमिका घेतल्यानंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांना मातोश्रीवर धाव घ्यावी लागली. बाळासाहेब ठाकरेंच्या काळात एखाद्या प्रसंग निर्माण झाल्यानंतर भाजपचे नेतेमंडळी अशीच मातोश्रीवर धाव घेत असत आणि बाळासाहेबांची समजूत काढीत असत. बाळासाहेबांच्या निधनानंतरही मातोश्रीची ही परंपरा कायम राहिल्याचेच दिसून आली. अर्थमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीला जाणे हे भाजप नेत्यांना पटलेले नाही. त्यामुळे शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुंबईतील नालेसफाईत घोटाळा आणि रस्त्यांची निकृष्ट कामांवरून शिवसेनेला टार्गेट केले. शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, राज्य सरकार व प्रमुख कंपन्या मिळून एमएसआरडीसीच्या धर्तीवर एक प्राधिकरण स्थापन करावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. भाजप पहारेकरीच्या भूमिकेत आहे. शिवसेना सरकारविरोधात उतरल्याने सेनेला दाबवण्याची खेळी भाजपकडून आखली जात आहे.
संतोष गायकवाड – 9821671737