मातोश्रीच्या जवळच ठाकरे कुटुंबाच नवं आलिशान घर

0

मुंबई । अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या राजकारणात व्यस्त असलेल्या शिवेसना पक्शप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेळात वेळ काढून नवीन बंगल्याच्या उभारणीची तयारी सुरु केली आहे. कलानगरमध्येच मातोश्रीपासून जवळच उद्धव ठाकरे यांची नवीन बिल्डींग उभी राहणार आहे.

कलानगरमध्ये राहणारे कलाकार कट्टीगेरी क्रिष्णा हेब्बर यांच्या मालकीच्या भूखंडावर ही इमारत उभी राहणार आहे. ठाकरेंची ही इमारत सहा मजली असणार असून इमारतीच्या बांधकामाची जबाबदारीतलाटी अँड पांथकी या आर्किटेक्चर कंपनीवर सोपवण्यात आली आहे. 10 हजार चौरस फुटांपेक्शा जास्त जागेवर बांधण्यात येणार्‍या या इमारतीत बेसमेंट, स्टिल्ट आणि सहा मजले असतील. इमारतीतील सर्व फ्लॅट्स ट्रिप्लेक्स असणार असून प्रत्येक फ्लॅटमध्ये पाच बेडरुम आणि एक स्टडी रुम असेल.

कलानगरमधील या भूखंडावर सुरुवातील कट्टेगिरी क्रिष्णा हेब्बर यांच्या मालकीचा दुमजली बंगला होता. 1996 मध्ये हेब्बर यांचा मृत्यू झाल्यावर त्याचा ताबा त्यांच्या पत्नि सुशीला आणि रेखा राव, रजनी प्रसन्ना आणि राणा हेब्बर यांच्याकडे आला. सुशीला यांचे मे 2006 मध्ये निधन झाल्यावर त्यांच्या मुलांनी 2007 मध्ये जागेचा विकास करण्यासाठी 3.5 कोटी रुपयांच्या मोबदल्यात प्लॅटिनम इंफ्रास्ट्रक्चर कंपनीला विकली. त्यानंतर कंपनीचे मालक राजभूषण आणि जगभूषण दीक्शित यांनी जागेवर आठ मजली इमारत बांधण्याची आणि भूखंड हस्तांतरणाची परवानगी मुंबई उपनगर जिल्ह्यााधिकार्‍यांकडून घेतली होती. त्यानूसार दीक्शीत यांना या जागेच्या विकासातून मिळणार्‍या रकमेतून सुमार 50 टक्के रक्कम राज्य सरकारकडे जमा करण्यास सांगितले होते.

त्यानंतर ठाकरे यांनी जमीनीचा ताबा आणि पुर्नविकास करण्यासाठी कलानगर सोसायटीकडे परवानगी मागितली. सोसायटीने 24 सप्टेंबर 2016 मध्ये आवश्यक त्या परवानग्या दिल्यावर ठाकरे यांनी हा भूखंड 11.60 कोटी रुपयांना खरेदी केला. भूखंडाचा ताबा मिळवताना ठाकरे यांनी 5.8 कोटी रुपये प्लॅटिनम इंफ्रास्ट्रक्चरला दिले आणि उर्वरीत 5.8 कोटी रुपये मुंबई उपनगर जिल्हाधिकार्‍यांकडे जमा केले. या व्यवहारापोटी आकारण्यात आलेली 58 लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरल्यावर मुंबई महापालिकेने 17 ऑक्टोबर 2016 रोजी बाधंकाम करण्यास परवानगी दिली. या संदर्भात ठाकरे कुटुबिंय किंवा त्यांचे स्विय सहाय्यक मिलींद नार्वेकरही प्रतिक्रीयेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत.