नारायण राणेंची उद्धव ठाकरेंनी धमकी
सांगली : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्यावर आहेत. राणे यांनी या दौर्यात अपेक्षेप्रमाणे शिवसेनेला लक्ष्य केले आहे. शनिवारी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधत काही गंभीर आरोपही केले. उद्धव यांनी माझ्यावर काहीही आरोप करु नयेत, त्यांनी तोंड बंद ठेवावे अन्यथा मातोश्रीवरील सर्व घटना आणि गुपिते बाहेर काढू, अशी जाहीर धमकीच राणेेंनी दिली. ते सांगलीत पत्रकारांशी बोलते होते.
उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना त्रास दिला
नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी माझ्या विरोधातील षडयंत्र थांबवावीत नाहीतर उद्धवने मातोश्रीवर बाळासाहेबांना कसा त्रास दिला हे मी उघड करेन. मी बाळासाहेबांना कोणत्याही प्रकारचे दु:ख दिले नाही. याउलट मातोश्रीवर त्या काळात काय-काय घडले हे मी माझ्या डोळ्यांनी बघितले आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बाळासाहेबांना प्रचंड त्रास दिला, असा गंभीर आरोपही राणेंनी केला. उद्धव यांना केव्हा काय बोलावे हे कळत नाही. त्यांना राजकारणाचा गंध नाही. त्यांचे भाषण 18 मिनिटांच्यावर जातच नसल्याची टीकाही राणेंनी केली.
गुजरातेत काहीही घडो, मी मंत्री होणार!
माझ्यावर शिवसेनेचा कोणताही दबाव नाही. गुजरातमध्ये काहीही झाले तरीही मी मंत्री होणार आहे. भाजप जिंकल्यानंतर माझा शपथविधी होईल. हे मला मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावरुन वाटते. गुजरातमध्ये भाजप विजयी होईल, पण ही लढाई भाजपसाठी सोपी नाही, पण भाजप नक्कीच जिंकेल असे मला वाटते. असा विश्वासही राणेंनी व्यक्त केला. मी विधानपरिषद जिंकलो असतो, पण येथील निवडणुकीचा काही परिणाम गुजरात निवडणुकीवर होऊ नये असे मुख्यमंत्र्यांना वाटत होते. त्यामुळे मला उमेदवारी देण्यात आली नाही. ती उमेदवारी प्रसाद लाड यांना मिळाली आणि ते निवडूनही आले, असे स्पष्टीकरणही नारायण राणे यांनी दिले.