मातोश्रीला छावणीचे स्वरुप; आमदारांच्या बैठकीत मोबाईलवर बंदी !

0

मुंबई : राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा गेल्या १५ दिवसांपासून सुटलेला नाही. मुख्यमंत्री पदावरून शिवसेना-भाजपात रस्सीखेच सुरु असल्याने नवीन सरकार बनू शकलेले नाही. दरम्यान सद्यस्थितीत राज्यातील सत्ता स्थापनेचे सगळे सूत्र ज्याच्या हातात आहे असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे सरकार स्थापनेबद्दल आपला निर्णय जाहीर करु शकतात. दरम्यान या बैठकीसाठी शिवसेना आमदार मातोश्रीवर पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. अंतर्गत बैठकीतील काहीही बाहेर लिक होऊ नये यासाठी खबदारीचा उपाय म्हणून या बैठकीत मोबाईल फोनवर बंदी घालण्यात आली आहे. तर मातोश्रीला छावणीचे स्वरुप आले आहे. मातोश्रीबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

यानंतर शिवसेनेच्या आमदारांशी इतर कोणाचाही संपर्क होऊ नये म्हणून शिवसेनेच्या आमदारांची रवानगी नरिमन पॉईंट इथल्या हॉटेल ट्रायडंटमध्ये होणार आहे. आमदार फुटीच्या भीतीने शिवसेना हे पाऊल उचलणार असल्याचे कळते. सत्ताधाऱ्यांनी सर्व पक्षांचे आमदार फोडण्याचा गेल्या काही दिवसात प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. त्यासाठी भाजपने गुंडांचा, धमक्यांचा वापर केल्याचेदेखील राऊत यांनी सांगितले होते. त्यामुळे शिवसेनेने सावध पवित्रा घेतला आहे.