मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : माथाडी कामगार मंडळातील रिक्त पदे भरताना नोंदणीकृत कामगारांच्या पाल्यांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश देतानाच माथाडी कामगारांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्यावर कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
काल सोमवारी माथाडी कामगार संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आले होते. त्यावेळी उद्या, मंगळवारी यासंदर्भात कामगार, महसूल आणि गृह विभागाची एकत्रित बैठक घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. त्यानुसार आज मंत्रालयात माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, माथाडी कामगार संघटनेचे सरचिटणीस तथा आमदार नरेंद्र पाटील, शशिकांत शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आमदार नरेंद्र पाटील व शशिकांत शिंदे यांनी माथाडी कामगार मंडळाच्या विविध मागण्या सादर केल्या. यावेळी विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी या मंडळातील रिक्त पदांची संख्या पाहता तातडीने पद भरती करण्यात यावी. ही कार्यवाही करतांना नोंदणीकृत कामगारांच्या मुलांना प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्याचबरोबर बोगस माथाडी कामगारांवर पोलिसांनी कारवाईची मोहिम हाती घ्यावी. यावेळी ग्रोसरी बोर्डवर माथाडी कामगारांचे प्रतिनिधी घेणे, मंडळाची पुनर्रचना करणे, अन्य मंडळांचे समावेशन आदी विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली.