* मध्यरात्री रात्री 1.30 चा प्रकार
* परिसरात संताप, सीसीटीव्ही संशयित कैद
जळगाव – राज्यात अनेक ठिकाणी असलेले दुचाकी जाळण्याचे लोण जळगाव शहरात देखील पोहचले आहे. गुरूवारी रात्री 1.30 च्या सुमारास नवीन जोशी कॉलनी परिसरात माथेफिरूने तीन दुचाकी जाळल्या. दरम्यान, संशयित सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे. शुक्रवारी सकाळी परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. पुणे, मुंबई, नाशिक शहरात मध्यरात्री दुचाकी, चारचाकी जाळण्याचे प्रकार नेहमी होत असतात. पोलिसांनी अशा प्रकारांमध्ये अनेकांना अटक देखील केली आहे. जळगाव शहरात देखील दुचाकी जाळण्याचे प्रकार घडू लागले आहे.
मध्यरात्रीनंतर घडला प्रकार
गुरूवारी रात्री नवीन जोशी कॉलनीत राहणार्या कविता अशोक वैद्य यांची दुचाकी क्रमांक एमएच 19 बीडी2867, गिरीश रामदास जाधव यांची दुचाकी क्रमांक एमएच 19 बीआर 5422, सुहास जाधव यांची दुचाकी क्रमांक (एमएच 19 सीई 9526) यांची दुचाकी 1.30 च्या सुमारास जाळण्यात आली.
नागरिकांनी केला विझविण्याचा प्रकार
आगीचे लोळ आणि धुर दिसल्यानंतर परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. नागरिकांनी पाणी ओतून आग विझविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, दोन दुचाकी संपूर्ण जळाल्या तर एका दुचाकीचा आणि लोटगाडीचा काही भाग जळाला आहे.
पोलिसांकडून पाहणी, सीसीटीव्ही तपासणार
शुक्रवारी सकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक योगेश शिंदे यांच्यासह पथकाने परिसरात पाहणी केली. नवीन जोशी कॉलनीत असलेल्या मोकळ्या जागी लावलेल्या मैदानातील मोठ्या हायमास्टचे स्वीच बंद करताना एक तरूण सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे. पोलीस प्रशासनाकडून फुटेज ताब्यात घेण्यात येणार आहे.