माथेरानची मिनी ट्रेन लवकरच धावणार !

0

माथेरान (चंद्रकांत सुतार) : माथेरानच्या मिनिट्रेनला बंद होऊन वर्षपूर्ती झालेली असल्याने ही सेवा सुरळीतपणे रूळावर यावी यासाठी स्थानिकांनी आमदार, खासदार, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन मिनी ट्रेन सुरु करण्यासबंधीचे गार्‍हाणे मांडले होते. मागील आठवड्यातच माजी नगराध्यक्ष अजय सावंत, मनोज खेडकर, विवेक चौधरी, नगरसेवक शिवाजी शिंदे यांनी मध्य रेल्वेचे मुख्यव्यवस्थापक डी के शर्मा यांचीही माथेरान मिनी ट्रेन सुरु करण्यासाठी भेट घेउन चर्चा केली. रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने घेऊन मे महिन्यांपासूनच कामाला गती देत युद्धपातळींवर कामे करून रेल्वेसेवा सुरळीत केल्याचे निदर्शनास आले आहे. रेल्वेचे चीफ मेन्टनन्स अभियंता के.पी.सोमकुंवर आणि चीफ बांधकाम अभियंता ए.के.सिंह यांनी ही माहिती दिली. रविवारी 13 ऑगस्ट रोजी रेल्वे चाचणीसाठी कामगार गाडी माथेरान स्थानकात दाखल झाली होती. याच वेळी रेल्वेच्या या मुख्य अधिकाऱ्यांना समक्ष भेटून गाडी बाबतीत नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, उप नगराध्यक्ष आकाश चौधरी, गट नेते प्रसाद सावंत, माथेरान नागरी पतसंस्थेेचे सभापती हेमंत बिरामणे यांनी सविस्तरपणे चर्चा करून लवकरच मिनिट्रेन सुरू करावी, अशी मागणी केली.

इथल्या स्थानिकांना तसेच पर्यटकांना ट्रेन बंद असल्यामुळे अनेक अडचणींंचा मुकाबला करावा लागला असेलच, हे आम्ही स्वतः इथे आल्यावर अनुभवले आहे. दळणवळणाच्या अन्य साधनांची व्यवस्था येथे कार्यान्वित नसल्याने इथे येणे खरोखरच खूपच त्रासदायक आहे. यासाठी ही सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे, असे के.पी.सोमकुंवर यांनी आश्वासन दिले आहे. त्याचप्रमाणे पूर्वी पावसाळ्यात केवळ गणपती उत्सवात दोन दिवस नेरळहून खासकरून गणपती आणण्यासाठी ट्रेन सुरू असायची. याही वेळेस गणपतीपूर्वी गाडी सुरू व्हावी, अशी आम्हांला आशा आहे. याकामी आपल्याच माध्यमांतून प्रयत्न करून सर्वांच्या व्यवसायासाठी ट्रेन सुरू होणे नितांत गरजेचे असल्याचे गटनेते प्रसाद सावंत यांनी सांगितले.