ठाणे : पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानच्या धर्तीवर ठाण्यातील कळवा येथील खाडीकिनारी उभारलेल्या नक्षत्रवनात चिमुकल्या बाळगोपालांसाठी टॉयट्रेन सुरु करण्यात आली आहे. यंदाच्या सुट्टीच्या मोसमात या मिनी ट्रेनमधून सफर करण्याचा आनंद लुटण्यासाठी चिमुकल्या बाळगोपालांची गर्दी होत आहे. उद्यानातील वन्यप्राण्यांच्या प्रतिकृतींच्या सहवासाचा अनुभव या टॉयट्रेनमधून सफर करताना बच्च्चेकंपनीला घेता येत आहे. कळवा परिसरात आबालवृद्धांसाठी एक हक्काचे विरंगुळ्याचे ठिकाण यानिमित्ताने उपलब्ध झाले आहे.
ठाणे महापालिकेच्या कळवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक २३ मध्ये येणाऱ्या कळवा खाडी किनारी ब्रिटीशकालीन पुलालगतच्या नक्षत्रवनाच्या बाजूच्या पडीक भूखंडावर टॉयट्रेनचा प्रकल्प साकारण्यात आला आहे. पूर्वी या ठिकाणी कचराकुंडी होती. भविष्यात भूखंडावर अतिक्रमण होण्याचा धोका लक्षात घेत तेथे सदर प्रकल्प राबविण्याची योजना आखण्यात आली. ठाणे महापालिकेच्या वतीने उभारलेल्या या प्रकल्पासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक मुकुंद केणी आणि प्रमिला केणी यांच्या प्रभाग सुधारणा निधीमधून २० लाख रुपये खर्च करण्यात आले. यासाठी नाशिक येथून टॉयट्रेन आणण्यात आली आहे. या मिनी ट्रेनच्या इंजिनला आणखी चार डबे जोडलेले आहेत. तर पुणे येथून आणलेल्या जिराफ, हत्ती, मोर, हरणे यासारख्या वन्य प्राण्यांच्या प्रतिकृती येथील वृक्षांच्या सहवासात शोभा वाढवत आहेत. त्यामुळे टॉयट्रेनची सफर करताना जंगलची सैर करण्याचा आगळावेगळा अनुभव बच्च्चेकंपनी घेत आहे. विद्युत रोषणाईसह उभारलेले रंगीबेरंगी कारंजे येथे येणाऱ्यांना आनंद द्विगुणीत करत आहे. या उद्यानात टॉयट्रेनसाठी छोटेखानी रेल्वे स्थानक उभारण्यात आले असून त्याला महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या दिवंगत मातोश्रींचे- शकुंतलादेवींचे नाव देण्यात आले आहे. या प्रकल्पाचे उद्घाटनही आयुक्त जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आयुक्तानीही सहपरिवार या टॉयट्रेनमधील सफरीचा आनंद लुटला.
जेव्हा वर्तुळाकारातील छोट्या लोहमार्गावरून टॉयट्रेन चिमुकल्या बाळगोपालांना घेऊन सफरीवर निघते तेव्हा माथेरान येथील मिनी ट्रेनची आठवण उपस्थितांना झाल्याशिवाय राहत नाही. या झुकझुक गाडीत बसून सैर करण्यासाठी नाममात्र प्रती माणसी २० रुपये शुल्क आकारण्यात येत असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. यंदाच्या सुट्टीत तसेच कामाच्या धबडग्यात कळवा खाडी किनारीची ही जंगल सफर परिसरातील आबालवृद्धांसाठी एक हक्काचे विरंगुळ्याचे ठिकाण झाले आहे.