शासकीय निधी मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींना वारंवार शासन दरबारी मारावे लागतात खेटे; गाव तिथे रस्ता योजनेला हरताळ
चंद्रकांत सुतार, माथेरान – गाव तिथे विकास, सोयीसुविधा अन योजनांनी परिपूर्ण व्यापक सुधारणा असे असतांना विकास तर दुरच परंतु स्थापीलेले गावच नेस्तोनाभूत करण्याच्या मार्गावर अनेक पर्यावरणवादी मंडळी आगेकुच करीत आहेत. त्यामुळे माथेरानसारख्या या टुमदार पर्यटनस्थळावर मोठे संकट येऊन ठाकलेले आहे. असंख्य पर्यटनस्थळेे या देशात आहेत. जिकडे तिकडे शासन विकासाची कवाडे खुली करीत असुन त्या त्या भागात विशेषतः ग्रामीण भागातील सुधारणेवर अधिक भर देत आहे. करोडो रुपयांची विकास कामे प्रगती पथावर नेली जात असताना माथेरानला शासकीय निधी मिळण्यासाठी सुद्धा लोकप्रतिनिधींना वारंवार शासन दरबारी खेटे मारावे लागतात परंतु नेहमीच काहींना काही कारणास्तव टाळाटाळ केली जात आहेत.
नेमलेल्या पर्यावरण समित्यांमूळे बांधकामांना आडकाठी
माथेरानच्या बांधकामांवर अंकुश ठेवण्यासाठी शासनाने काही पर्यावरणीय समित्या नेमलेल्या आहेत. यांची नेहमीच विकास कामांना आडकाठी येते. मुंबईमध्ये राहुन इथल्या अडीअडचणींंबाबत त्यांना चिंता वाटते. परंतु या व्यत्यय आणणार्या मंडळींनी काही दिवस इथे राहुन इथल्या समस्यांचे, स्थानिकांना तसेच पर्यटकांना भेडसावत असलेल्या त्रुटी जाणुन घेण्याऐवजी ही मंडळी उंटावर बसुन शेळ्या हाकण्यासाठी तत्परता दाखवीत आहेत. या पर्यावरणीय वाद्यांना या गावाविषयी सुतभर सोयरसुतक नाही केवळ शासनाचे प्रतिनिधी म्हणुन कर्तव्य तत्परता दाखविण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करू पहात आहेत.
शासनाकडून जनतेची दिशाभुल
शासन एकीकडे गाव तिथे रस्ता, गाडी, विकास, योजना, असे सर्वंकष निकष देऊ अशीच केवळ घोकंपट्टी करून जनतेची दिशाभुल करण्यात धन्यता मानत आहे. इकडे येण्यास सहसा कुणीही नामदार मंडळी फारशी धजावत नाहीत कारण त्यांना इथल्या वाहतुक व्यवस्थेची पुर्ण कल्पना आहे. त्यातच पक्षाला किती मते आहेत. त्यामुळे चार पाचशे मतांसाठी नाहक वेळ खर्ची घालत नाहीत. मागील काळात पालकमंत्र्यांनी बोलुन दाखविले की इथे जाण्यास सुविधा नाही त्यामुळे येऊ शकत नाही अशीच जर परिस्थिती राहिल्यास या अपूर्णतेच्या परीसीमेस जबाबदार कोण असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.