माथेरानच्या समस्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे साकडे

0

माथेरान : माथेरानला अनेक समस्यांनी ग्रासले असुन वारंवार शासन दरबारी पाठपुरावा करून सुद्धा पुरेशा प्रमाणात येथील नेहमीच्याच उद्भभवणार्‍या जटिल समस्येमुळे स्थानिकांसह, पर्यटकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकामी मुलभुत समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी विद्यमान नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनांत भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले. माथेरान हा बिनशेतीचा भाग असल्याने पर्यटन याच शेतीवर सर्वांचे जीवनमान अवलंबुन आहे. त्यातच मागील वर्षभरापासुनच मिनिट्रेन बंद असल्याने स्थानिकांच्या उदरनिर्वाहावर उपासमारीची वेळ आलेली असुन पर्यटकांच्या संख्येत प्रामुख्याने घट होत असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांच्या निदर्षनास आणले.

माथेरानचा विकास आराखडा बनविणे गरजेचे
2003 मध्येच हे पर्यटनदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र घोषीत झाल्यापासून कुठल्याही बांधकामांस परवानगी दिली जात नाही. अनेक वर्षांपासून विकास आराखडाही प्रलंबित आहे. त्यामुळे स्थानिकांच्या बांधकामांस सातत्याने संबंधीत खात्याचा प्रकर्षाने विरोध होत आहे. यासाठी विकास आराखडा बनविणे गरजेचे बनलेले आहे. सध्या दस्तुरी नाक्यावर वनवीभागाचे वाहनतळ आहे तिथे सुट्ट्यांच्या हंगामात खाजगी वाहनांना पार्किंग करतेवेळी असंख्य अडचणी येतात त्यासाठी एम.पी.प्लॉट क्र.93 हा रिक्त असुन तो नगरपालिकेकडे वर्ग केल्याशिवाय पार्किंगची समस्या शिथिल होणार नाही. जमिनीची पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात धूप होत असते यामुळे भूभाग खचत आहे. यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी नगरपालिकेस निधी उपलब्ध झाल्यास त्याची अंमलबजावणी करता येऊ शकते अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

मॉनेटरींग कमिटीच्या मीटिंगमध्ये नगराध्यक्षांना स्थान द्या
मॉनेटरींग कमिटीच्या मीटिंगमध्ये नगराध्यक्षांना स्थान दिले जात नसल्यामुळे गावाविषयी त्यांनी काय निर्णय घेतले याचा उलगडा होत नाही. तसेच कचरा उचलण्यासाठी मनुष्यबळ कमी पडत आहे त्यासाठी इथे ट्रॅकटर सुरू करण्यास परवानगी दिल्यास स्वच्छता बाबतीत कायमस्वरूपी तोडगा निघू शकेल. इथल्या सर्वसामान्य नागरिकांना शासकीय दाखले अधीक्षक कार्यालयांत उपलब्ध होतात परंतु अधीक्षक यांची बदली होणार असल्याने स्थानिकांना हे त्रासदी बनणार आहे यासाठी अधीक्षक यांची बदली थांबवावी अथवा नव्याने नेमणूक करण्यात यावी.