माथेरानमधील नागरिक स्वच्छता राखण्यासाठी ठरताहेत असमर्थ

0

माथेरान । घराची ओळख अंगण सांगते ही म्हण खर्‍या अर्थाने माथेरानला सध्या लागू पडत आहे. इथल्या बहुतांश भागातील नागरिकांची स्वच्छतेच्या बाबतीत मानसिकता हरपल्यामुळे काही भागांत नागरिकांच्या अक्षम्य घोडचुकांंमुळे त्या त्या ठिकाणी दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले दिसते आहे. याकामी ठरावीक प्रभागातील सुज्ञ नागरिकांनी जेथे जेथे कचरा टाकला जातोय त्या जागीच पत्र्यांचे कुंपण टाकण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून सुरुवात केली आहे जेणेकरून अभ्यासू, अन् प्रतिष्ठित कुटुंबाला, लहान मुलांना, पादचार्‍यांना नेहमीच होणारा नाहक त्रास सहन करावा लागणार नाही.

पर्यटकांना दुर्गंधीचा सामना करावा लागू नये यासाठी खबरदारी घेणे गरजेचे
माथेरान नगरपालिकेचे कर्मचारी नियमितपणे गावातील मुख्य रस्त्यांसह गल्ल्याबोळांत स्वच्छता करीत असतात. परंत,ु काही प्रभागांतील नागरिक विशेषतः महिला वर्ग ह्या हेतुपुरस्सर रस्त्यांवर अथवा जवळपास ओला, सुका कचरा यामध्ये उष्टांन्न, फळांच्या टरफली, भाजीपाला कचरा टाकत आहेत. याचा विनाकारण त्रास सततच्या रहदारी करणार्‍या लोकांसह पर्यटकांना सोसावा लागत आहे. गावातच अनेक भागात घरगुती लॉजिंग आहेत. त्यामुळे निदान लॉजिंगमध्ये राहणार्‍या पर्यटकांना दुर्गंधीचा सामना करावा लागू नये यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे. जर अशाच प्रकारे घाणीचे साम्राज्य असेल तर इकडे कुणीही पर्यटक फिरकणार नाहीत. पर्यटक आहेत तरच माथेरानचा व्यवसाय शाबूत आहे, रोजगाराचे साधन आहे हे ओळखून प्रत्येकाने आपापल्या परीने स्वच्छतेबाबतीत आगेकूच केली पाहिजे, असेही सुशिक्षित व्यक्ती बोलत आहेत.

सुज्ञ नागरिक संतप्त
नगरपालिकेने सर्वच प्रभागात कचरा कुंडी लावलेली आहे. यांमध्ये ओला आणि सुका कचरा नागरिकांना सहजपणे टाकता यावा अशीच सोय केलेली आहे. पण कचरा कुंडीत टाकण्याऐवजी अनेकजण कुंडी बाहेर तर कुणी इतस्ततः पसरवत आहेत. अनेकदा नगरपालिकेस स्वच्छताबाबतीत शासनाने पुरस्कार बहाल केलेले आहेत. याची जाणीव इथल्या नागरिकांस नसल्याने त्यांच्याच गलिच्छ वर्तणुकीबाबत सुज्ञ नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाक्यापासून अस्वच्छतेची किळसवाणी दृश्ये पाहून पर्यटकांमध्ये नाराजी दिसून येते.