मुरूड रायगड । माथेरानचा संपूर्ण भूभाग हा काळ्या कातळावर असून डोंगरमाथ्यावरची सर्व जागा रस्ते हे लाल तांबड्या दगडामातीचे आहेत. दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांची दुरुस्ती तसेच गटारे, मोर्या यांची स्वच्छता करून रस्ते सुस्थितीत ठेवण्यात नगरपालिका नेहमीच अग्रेसर असते. परंतु, यावेळेस ही मान्सूनपूर्व कामे उशिराने हाती घेण्यात आली असून होत असलेली कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची केली जात आहेत. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
माथेरामध्ये यापूर्वीच ब्रिटिश काळात एकूण 52 किलोमीटरचे रस्ते अत्यंत नियोजन पद्धतीने बनवलेले आहेत. रस्ते बनवताना पुढील शंभर ते दीडशे वर्षे टिकतील अशाच स्वरूपाची आखणी त्यावेळेस त्यांनीच केल्यामुळे अनेक ठिकाणी हे रस्ते आजही जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. परंतु कालांतराने येथील अनेक ठिकाणी रस्त्यांची दुर्दशा झालेली पाहावयास मिळत आहे. रस्ते की गटारे पावसाळ्यात आपण रस्त्यातून चालत आहोत की गटारातून रस्ता शोधत आहोत याचा स्वानुभव आल्याशिवाय राहत नाही. मागील वर्षांपूर्वी दस्तुरी ते पांडे रोडपर्यंतच्या रस्त्यांची कामे जवळपास 49 कोटी रुपयांची ही महत्त्वपूर्ण कामे मुंबई महानगर विकास प्राधिकरण अंतर्गत केली जाणार होती. परंतु, त्यांनी अद्याप सुरू केलेली नाहीत त्यानुसार याचा नाहक त्रास येणार्या पर्यटकांना तसेच स्थानिक नागरिक, शालेय विद्यार्थी, हात रिक्षाचालक, आबालवृद्ध नागरिक आणि सर्वसामान्य कष्टकरी घोडेवाल्यांना सोसावा लागत आहे.
सध्यातरी मुख्य बाजारपेठेतील रस्ते हे पूर्णतः चिखलमय झालेले असून यातून रस्ता शोधावा लागत आहे. माथेरान हा बिनशेतीचा भाग म्हणून संबोधले जाते. परंतु, सद्यःस्थितीत हे रस्ते पाहिल्यास शेती योग्य रस्ते झालेले आहेत. एवढया मोठया प्रमाणात चिखल झालेला दिसत आहे. त्यातच नगरपालिका प्रशासनाने नुकताच रस्त्यावर असलेल्या ब्रिटिश कालीन मोर्यांची डागडुजी करण्यास सुरुवात केली असून मोठमोठे सिमेंटचे पाणी वाहण्याचे पाइप दगडगोटे टाकून न बुजवता वरचेवर ठेवलेले आहेत तर एस.टी.पी. सारख्या धोकादायक लाइनसुद्धा रस्त्याला लागून याच मोर्यात टाकलेल्या आहेत. त्यामुळे त्या त्या ठिकाणी पादचार्यांना पायी प्रवास करताना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे, तर घोड्यांचे पायदेखील या चिखलात रुतत आहेत.