माथेरान (चंद्रकांत सुतार) : आजच्या आधुनिक युगात नवनवीन तंत्रज्ञाने विकसीत होत असुन कुठलीही मनुष्य बळाची कामे यंत्रांच्या आधारावर केली जात आहेत. त्यामुळे कामाची गती वाढलेली आहे. देश उन्नतीच्या अन् प्रगतीकडे वाटचाल करतांना दिसत आहे. याच आधुनिकतेच्या बळावर गावे ,शहरे खेडोपाडी सुधारणा होऊन अनेक पर्यटनस्थळेे सुशोभिकरणाकडे वाटचाल करीत असुन विकासात्मकता दिसुन येत आहे. परंतु याला फक्त माथेरान अपवादानेच मागे जात आहे. शुल्लक कामांसाठी तेसुद्धा रेल्वेच्या बाबतीतील असणारे काम करण्यासाठी वर्षापेक्षा अधिक कालावधी होऊन देखील अपुर्णावस्थेत असल्याने एव्हाना प्रलंबित रोप -वे केव्हाच मार्गी लागला असता असे स्थानिकांसह पर्यटकांमध्ये तीव्र स्वर उमटत असुन नाराजी आणि संताप दिसुन येत आहे.रेल्वेच्या कामाची गती अन्य खात्यांमध्ये सर्वाधिक समजली जाते.
लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांवर अनेकदा अपघाताची मालिका वर्षातुन अनेकवेळा सुरू असते अशावेळी रेल्वे प्रशासन काही मूग गिळून बघ्याची भुमिका घेत नाहीत तर युद्धपातळींवर कामे करून सेवा पूर्ववत सुरळीत केली जाते.मग या मिनिट्रेनच्या बाबतीत गती का मंदावली आहे.हे सुद्धा एक कोडेच होऊन बसलेले आहे.जूलै २००५ मधे रेल्वे मार्ग पुर्णत वाहुन गेला होता ,त्यावेळी राज्यकर्त्यांमधे असलेली इच्छाशक्ती अच्छेदीन वाल्या राज्यकर्त्यांमधे दिसत नाही. माथेरान सारख्या अशा विकासापासून शापित असलेल्या दुर्गम पर्यटनस्थळावर कुठल्याही विकास कामांच्या बाबतीत नेहमीच बोंबा ऐकावयास मिळत असतात यामुळे या सुंदर स्थळांची प्रतिमा मलीन करण्यास प्रामुख्याने प्रशासन जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.
एकीकडे प्रशासन अनेक कोटींची कामे रेल्वे बाबतीत करीत आहे.परंतु जवळपास सात कोटी रुपयांच्या निविदेचे काम तेसुद्धा वेळेत पुर्ण होऊ शकत नाहीत.माथेरानला संवेदनशील क्षेत्र घोषीत केल्यापासून इथे मोटार वाहनांना बंदी करण्यात आलेली असताना देखील रेल्वेचे हे स्थानिकांच्या तसेच पर्यटकांच्या सेवेसाठी महत्वाकांक्षी काम असल्याने स्थानिकांनी ही कामे करण्यासाठी जे.सी.बी.,ट्रक ,डंपर ,जीप आदी वाहने गावात आणण्यास मनाई केली नाही.कारण मिनिट्रेनशी सर्वांची नाळ जुळलेली असल्याने सर्वांचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन यावर अवलंबुन आहे.त्यामुळे ठेकेदाराने अंतर्गत केलेल्या मोटार वाहतुकीसाठी आडकाठी आणली नाही.परंतु ही कामे कासवाच्या गतीने सुरू राहिल्यास मिनिट्रेन पूर्वपदावर येण्यासाठी अजुन तरी ऑक्टोबर उजाडेल असेच एकंदरीत परिस्थिती वरून वाटत आहे.अद्याप पुष्कळ कामे बाकी आहेत.त्यामुळे कामे गतीने पुढे नेणे गरजेचे असल्याचे स्थानिकांसह पर्यटक बोलत आहेत.
मे महिन्यात आलो त्यावेळेस गाडी बंद असल्याचे समजले.आता एक वर्षानंतर पुन्हा आलो तरी ही आमची आवडती गाडी बंद असल्याने आम्ही पुन्हा नेरळहून रिटर्न मुंबईला गेलो.त्यामुळे माझ्या कुटुंबाचा पुरता हिरमोड झाला.रेल्वे प्रशासन या कामाबद्दल खूपच ढिल्ले दिसत आहे.निदान दिवाळी पुर्वी तरी ही सेवा सुरू करून आम्हाला सफर घडू द्यावी.
– शंतनू त्रिपाठी -पर्यटक मुंबई
माथेरानच्या .मिनिट्रेन मुळे सगळ्यांना व्यवसाय मिळत असतो.ही पर्यटकांचे आकर्षण असुन स्थानिकांची जीवनवाहिनी आहे.गाडी बंद असल्याने अनेकांच्या रोजगारावर विपरीत परिणाम झालेला आहे.यासाठी रेल्वेच्या अधिकार्यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन समस्या लवकरच मार्गी लावावी.
– प्रकाश सुतार -उपाध्यक्ष ,श्रमिक हातरिक्षा संघटना माथेरान
रेल्वे मार्गावरील हे अति धोकादायक झाड केव्हा उन्मळुन पडेल आणि जीवितहानी होईल याची शाश्वती नाही.