माथेरान । माथेरान हे निसर्गाने बनवलेले अद्वितीय पर्यटनस्थळ असून, इथे येणार्या पर्यटकांना तसेच स्थानिकांच्या समस्यांना न्याय देण्यासाठी आम्ही केंद्र शासनाकडे नक्कीच पाठपुरावा करू, असे आश्वासन ज्येष्ठ खासदार रामचंद्रन बोहरा यांनी दिले. ढोल-ताशे, सनई, चौघड्याच्या तालात आदिवासी नृत्याची कला पेश करून माथेरानमध्ये खासदार समितीचे जंगी स्वागत करण्यात आले. खासदारांच्या केंद्रीय समितीने पाहणी दौर्यावर असताना माथेरानला भेट दिली. यावेळी नियोजित समितीमधील एकूण तीस जणांपैकी फक्त तीन खासदारांनी उपस्थिती दर्शवली होती. दुपारी या समितीचे दस्तुरी नाक्यावर आगमन झाले. त्यावेळी खासदार रामचंद्रन बोहरा, रामकुमार शर्मा, विनय तेंडुलकर, कॅथरीन जॉन डेप्युटी डायरेक्टर समिती सदस्यांचे स्वागत विद्यमान नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी केले. ही समिती अमनलॉज येथून माथेरानपर्यंत शटल गाडीने गावात दाखल झाली. त्यावेळेस त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
प्रकल्पामुळे स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण
यावेळी सर्वपक्षीय मंडळींनी माथेरानला भेडसावत असलेल्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी समितीने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, असे सूचित केले. येथे अमानवीय पद्धतीने हातरिक्षा ओढण्याचे अतिकष्टदायी कामे एखाद्या ब्रिटिशकालीन गुलामगिरीप्रमाणे केली जात आहेत. यासाठी ई-रिक्षा सुरू होण्यासाठी प्राधान्याने पुढाकार घ्यावा, या आशयाचे लेखी निवेदन श्रमिक हातरिक्षा संघटनेचे सचिव सुनील शिंदे यांनी अध्यक्ष शकील पटेल, प्रकाश सुतार यांच्यासोबत खासदार रामचंद्रन बोहरा यांना दिले. माथेराननगरीचा पाहणी दौरा केलेल्या या समितीने मूलभूत समस्या केंद्र शासनाकडे मांडून निश्चितपणे पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले. यावेळी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत, उप नगराध्यक्ष आकाश चौधरी, गटनेते प्रसाद सावंत, प्रांत भडकवाड, मुख्याधिकारी डॉ.सागर घोलप, माजी नगराध्यक्ष अजय सावंत, मनोज खेडकर, विवेक चौधरी, माजी नगरसेवक प्रकाश सुतार यांसह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.