माथेरान पर्यटनस्थळ ठरले तरुणांसाठी बेरोजगारीचे केंद्र

0

माथेरान । प्रदूषण मुक्त पर्यटनस्थळ म्हणून मान्यता पावलेले माथेरान पर्यटकांसाठी पहिली पसंद असली तरी येथे राहत असलेल्या स्थानिक तरुणांसाठी मात्र बेरोजगारीचे केंद्र ठरू लागले आहे. पर्यटन हेच येथील व्यवसायाचे एकमात्र साधन आहे, पण त्यासाठी येथील तरुणांना अनेक मर्यादा आहेत. त्यामुळे दरवर्षी येथे बेरोजगार तरुणांच्या संख्येत वाढ होत आहे. ब्रिटिशांनी वसवलेलेे माथेरान आजही लालमातीच्या, घोडेस्वारी व हिरव्यागर्द झाडांनी आच्छादलेल्या पर्वत रांगांमुळे पर्यटकांची पहिली पसंद आहे. त्यामुळे येथे दरवर्षी पर्यटकांच्या संख्येत वाढ होताना दिसते. त्यामुळे येथे पर्यटनपोषक व्यवसायास चांगल्या संधी उपलब्ध आहेत, पण येथे लागू असलेल्या अनेक पर्यावरण मर्यादांमुळे माथेरानमध्ये पर्यटनाला हव्या असलेल्या सुविधांनी फारशी प्रगती केलेली नाही.

तरुणांना रोजगार मिळण्यास कठीण जात आहे. अनेक समस्यांना तोंड देत येथील तरुण बेरोजगार आपल्या भविष्याची स्वप्ने पाहत असताना शासनाच्या अनेक मर्यादांमध्ये गुरफटला जात आहे. त्यांनी सुरू केलेल्या अनेक रोजगारावर प्रशासनाकडून गदा आणली जात आहे. मागील काही दिवसांमध्ये येथील तरुणांनी कर्जाच्या बोजाखाली लॉजिंग व्यवसायात भरारी घेण्यास सुरवात केली होती, पण काही पर्यावरणवाद्यांनी त्याची ही घरेच अनधिकृत ठरावीत त्याच्यावर शासनामार्फत कारवाईची करून त्यांना आणखीनच कर्जात लोटले आहे, तर येथील काही ठिकाणी येथील काही तरुणांनी माथेरानमध्ये साहसिक खेळाचे आकर्षण असणार्‍यांसाठी व्हॅली क्रॉसिंग, बर्मा ब्रीज रोप क्लायमिंग सारख्या साहसिक खेळांची पर्वणी उभी केली होती हीसुद्धा बंद केली. त्यामुळे पन्नासपेक्षा अधिक तरुण पुन्हा बेरोजगार झाले.

येथील बाजारपेठीतील मध्यवर्ती ठिकाणी असलेले छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील आकाश पाळणा एक वर्षांपूर्वी बंद करून टाकला त्यामुळे येथे काम करणारे तरुणतर बेरोजगार झालेच पण पालिकेला मिळणार महसूलही बंद झाल्याने पालिका प्रश्‍नाने काय साधले असा प्रश्‍न हे तरुण विचारात आहेत. माजी नगराध्यक्ष प्रदीप दिवाडकर यांच्या कार्यकाळात माथेरानमधील बेरोजगार तरुणांना काही ठिकाणी व्यवसायाकरिता पालिकेमार्फत दुकाने देण्यात आली. त्यामुळे येथील तरुणाना रोजगार ही मिळाला होता व पर्यटकांसाठी खरेदीसाठी अधिक पर्याय उपलब्द झाले होते, पण त्यास आता वीस वर्षाहून अधिक काळ लोटला आहे त्या नंतर बेरोजगार तरुणांसाठी पालिकेकडून कोणतीही हालचाल झालेली नाही.

आगामी काळात येथे बेरोजगारीचा उच्चांक नक्कीच गाठला जाणार
माथेरानमधील सत्तर टक्के जागा ही वनविभागाच्या अधिपत्त्याखाली येत असल्याने येथे शेती, फळबागा किव्हा इतर उद्योगाना संधीच नाही तर येथील बहुतेक वस्ती ही माळीबांधवाची असल्याने संपूर्ण माथेरानमध्ये विखुरली आहे व त्याठिकाणी काहीही व्यवसायाच्या संधी उपलब्ध नाहीत शालेय शिक्षण दहावीपर्यंत पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षण अधिक खर्चिक होऊन जाते. कारण माथेरानमध्ये उच्च शिक्षणाची सोय नाही. त्यामुळे गरिबांची सुमारे वीस मुले ही दहावी नंतर बेरोजगार होत आहेत कारण अपुर्‍या शिक्षणाअभावी एक तर त्यांना हातरिक्षा किव्हा घोडा चालवणे अशा अमानुष व्यवसायात उतरावे लागते किव्हा बेरोजगारीचे जीवन घालवावे लागते त्यामुळेच येथील तरुणांची गेल्या अनेक वर्षांपासून बॅटरीवर चालणार्‍या रिक्षाची मागणी आहे, तर येथील लॉजिंग व्यावसायिक सरकारी नियम पाळून व्यवसाय करण्यास ाींवल मान्यता असलेली न्याहारी आवास योजनेची मान्यता असलेली प्रमाणपत्रे घेण्यास तयार आहेत, पण माथेरानसाठी दारेच बंद करून बसलेल्या शासनास येथील तरुणाचे दुखणेच दिसत नसल्याने आगामी काळात येथे बेरोजगारीचा उच्चांक नक्कीच गाठला जाणार आहे. येथे मागील काही वर्षांपासून येथील नागरीक मोठ्या प्रमाणावर स्थलातर करताना दिसत आहे.