माथेरान । माथेरानला एक पर्यायी वाहतुकीच्या साधनांची सोय अनेक वर्षानंतर रोप वेच्या माध्यमातून मार्गी लागत आहे. आगामी काळात इथे पर्यटकांची लक्षणीय संख्या वाढणारी आहे. रोप-वे मुळे व्यवसाय वृद्धिंगत होणार आहेत त्यामुळे सध्यातरी सर्वत्र आनंदाचे वातावरण स्थानिकांमध्ये दिसत आहे. पण त्यामुळे येथील लँडिंग पॉईंट असलेल्या माधवजी पॉईंट येथे प्रवाशांची सोय होऊ शकते का? हे पाहणे गरजेचे ठरणार आहे कारण माधवजी पॉइंटला जाणारा रस्ता येथील बाजारपेठही एकमेव नवरोजी उद्यानातून जातो तसेच त्याला लागूनच छत्रपती शिवाजी उद्यान आहे. माथेरान मध्यवर्ती भागात ही उद्याने असल्याने येथे नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते त्यामुळे रोपवेचे पर्यटकसुद्धा ह्याच ठिकाणी आले तर ह्या उद्यानांमध्येच गर्दी वाढणार असून, त्यामुळे उद्यानांच्या अस्तित्वाचाच प्रश्न पुढे येत आहे.
माथेरानकरांसाठी रोपवे ही अभिमानाची बाब आहे. रोपवेमुळे माथेरान हे जगाच्या नकाशावर एक प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास येणार आहे. रोप-वे कर्जतजवळील डिकसळ येथून सुरु होणार असून, माथेरानमधील माधवजी पॉईंट येथे संपणार आहे. त्यामुळे येथे येणार्या प्रवाशांची सोय होणे महत्वाचा मुद्दा आहे. त्याच बरोबर रोप- वेच्या थांब्याला येथील लागूनच असलेली दोन्ही गार्डन व माधवजी पॉइंट यांचे अस्तित्वच जपले जाणार का असाही प्रश्न येथील स्थानिकांना पडला आहे. आताच काम सुरू झाल्यानंतर येथील माधवजी पॉईंटला जाणारे पर्यटक कमी झाले आहेत. ह्या ठिकाणी खोदकामास सुरवातही झाली त्याकरिता नगरपालिकेची परवानगीच घेतली नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. प्रकल्प उभारताना अनेक झाडे कापली जाणार आहेत पण वनविभागाकडे किती झाडे कापली जाणार याचीसुद्धा इंत्थभूत माहितीच नसल्याचे समजते.
प्रवाशांची वर्दळ वाढणार
टाटा समूहाने यात लक्ष घातल्याने अनेक परवानग्या मिळण्यास सहकार्य झाले असल्याने स्थानिक प्रशासनाला यातून नेमका काय फायदा होणार? नगरपालिकेला भरीव उत्पन्न मिळणार कि फक्त पालिकेची जागा वापरण्यास उत्पनाचे मधाचे बोट दाखविले जाणार असल्याची येथे चर्चा आहे. या रोपवेने प्रत्येकी तासास 400 प्रवाश्यांची प्रवास करण्याची क्षमता असल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ वाढणार आहे. त्यांची सोय कशी केली जाणार याचे स्पष्टीकरण रोपवे प्रायोजक कंपनी करू शकली नाही. रोपवेमुळे उद्यानांना कोणताच धोका नाही असे प्रायोजकांचे म्हणणे आहे.