माथेरान रोप वे ला आशेचा किरण !

0

माथेरान (चंद्रकांत सुतार) : आजवर जे काही इथल्या पिढ्यान् पिढ्या रहिवास करणाऱ्या अन् विविध अडिअडचणीवर मात करून एकप्रकारे संघर्षमय जीवन व्यथित करून केवळ या गावाशी नाळ जुळलेली असल्यामुळे आपल्या मुलाबाळांबरोबर राहाणाऱ्या भूमिपुत्रांच्या असहाय्य संकटानंतर आता इथे पर्यायी वाहतुक व्यवस्था म्हणुन रोप-वे चा महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागणार आहे त्यामुळे सध्यातरी हा एकमेव वाहतुकीच्या दृष्टीकोनातून सर्वांसाठी आशेचा किरण उपलब्ध होणार आहे यामुळे स्थानिकांसह इथे नियमितपणे येणाऱ्या पर्यटकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

माथेरान हे टुमदार पर्यटनस्थळ सह्याद्रीच्या कुशीत स्थिरावले असुन चोहोबाजूला उंच उंच महाकाय काळ्या कभिन्न खडकावर विराजमान झालेले आहे.घनदाट झाडीने परिपूर्ण व्यापलेला भाग ,पन्नास ते साठ फुट उंची असलेले बहारदार वृक्ष ,शुद्ध हवा ,प्रदुषण विरहित थंड हवेचे ठिकाण म्हणुन नावारूपास आलेले जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ अशी अलौकिकता लाभलेले आहे.या दुर्गम स्थळाचा शोध १८५० मध्ये ठाण्याचे कलेक्टर ह्यूज मॅलेट यांनी लावल्यानंतर १९०७ साली सर आदमजी पिरभॉय यांनी या डोंगरावर मिनिट्रेन सुरू केल्यापासून हे स्थळ खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आलेले आहे.

परंतु आजवर इथे येण्यासाठी नेरळ मार्गेच रस्ता असल्याने आपत्कालीन वेळी जर का भविष्यात काही विपरीत घडले तर स्थानिकांना स्थलांतरीत होण्यासाठी अन्य मार्गाची सोय शासनाने उपलब्ध केलेली नाही.चार दशकांपासुन स्थानिक मंडळी पर्यायी मार्गासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करीत आहे पण शासनाने सदरची बाब गांभीर्याने घेतली नव्हती.अनेकदा रोप-वे प्रकल्प सुरू व्हावा यासाठी मागील पंधरा वर्षांपासून येथील हॉटेल उषा एस्कोटच्या मालकाने पाठपुरावा केला होता त्यावेळेस पर्यावरण वाद्यांनी खोडा घातला होता.राज्य शासन केंद्र्शासन यांच्या कचाट्यात हा महत्वाकांक्षी प्रकल्प गूलदस्त्यात अडकला होता परंतु शेवटी स्थानिकांच्या सततच्या पाठपुराव्याला अखेरीस यश येत असुन नुकताच याबाबतीत जून महिन्यात विशेष बैठक आयोजित करून कुणाच्या काही हरकती वा तक्रारी असल्यास त्यावर अंमलबजावणी करण्यात येईल असे निवासी जिल्हाधिकारी किरण पाणबुडेे यांनी स्पष्ट केले होते.त्यावेळी हेरिटेज कमिटीचे सदस्य ,ग्रामस्थ तसेच परिसरातील मंडळीनी आपापल्या समस्या कथन केल्या होत्या त्यानुसार रोप-वे साठी फारसा विरोध नसल्याने हे काम जानेवारी पासुन प्रगती पथावर लागण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

रोप -वेच्या माध्यमातून इथे हौशी आणि खर्चिक पर्यटकांची गर्दी वाढणारी असल्याने सध्यातरी साठ हॉटेल्स आणि जवळपास पाचशेहुन अधिक घरगुती लॉजिंगच्या खोल्या सुध्दा अपुर्या पडतात.यासाठी स्थानिकांनी पर्यटकांच्या सोयीसाठी आपल्याच जागेत वाढीव खोल्या बांधलेल्या आहेत.त्यावर हरित लवादाने टाच आणलेली आहे.त्यामुळे बांधकामे करणे अधिक अडचणीचे झाले आहे.जोपर्यंत विकास आराखड्याला शासन मान्यता देत नाही तोवर स्थानिकांच्या बांधकामांवर टांगती तलवार आहे.याकामी शासनाने निदान माथेरान या पर्यटनस्थळावरील पर्यटकांची वाढती संख्या पाहता त्यांच्याच निवासास्तव कायद्यात बदल करणे गरजेचे बनले आहे.अन्यथा एकीकडे गावाचे हित साधताना स्थानिकांच्या घरांवर बुलडोजर फिरविणे हे अन्यायाचे द्योतक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

रोपवे चा प्रकल्प मार्गी लागत असतानाच प्रस्तावित असलेला पनवेल -धोदाणी असा फीनाक्युलर रेल्वे सुध्दा सुरू करण्यासाठी शासनाने मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या पुढाकाराने ही सुद्धा पर्यायी व्यवस्था कार्यान्वित केल्यास या स्थळाचा आमूलाग्र बदल होऊन इथे खऱ्या अर्थाने विकासाची गंगा वाहेल.सर्वांनाच उपजीवीकेचे साधन प्राप्त होऊन सर्वसामान्यपणे जीवन कंठीत करणारा मोलमजूर सधन होईल.असे सुज्ञ नागरिकांमधुन बोलले जात आहे.