माथेरान शटल सेवेच्या फेर्‍या वाढवण्याची प्रवाशांची मागणी!

0

माथेरान । माथेरान मिनी ट्रेन शटल सेवेच्या मर्यादित फेर्‍या असल्यामुळे नेरळमार्गे मुंबई-पुण्याकडे जाणार्‍या प्रवाशांना वेळापत्रकानुसार प्रवास करण्यासाठी अन्य मध्य रेल्वेच्या गाड्यांतून प्रवास करण्यास मिळत नाही. त्यासाठी वेळापत्रकात बदल करून शटलच्या पहाटे 5-45 वाजल्यापासूनच सायंकाळी 6 वाजेपर्यंत नियोजित फेर्‍या असाव्यात. जेणेकरून स्थानिकांना नेरळ अथवा कर्जत येथे प्रवास करण्यासाठी दस्तुरी येथून मिनीबसच्या नियोजित वेळापत्रकानुसार तसेच शेवटची सव्वा सहा वाजता सुटणार्‍या मिनीबसच्या सेवेचा लाभ घेता येऊ शकतो, अशी मागणी स्थानिकांसह पर्यटकांकडून करण्यात येत आहे.

शटल सेवेच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाला उत्पन्नाचे साधन प्राप्त
दीड वर्षांपासून बंद असलेली माथेरानची मिनिट्रेन अनेक अडचणींनंतर स्थानिकांच्या संघटनात्मक धोरणामुळे आणि सर्वपक्षीय नेतेमंडळींच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे सुरू करण्यात आलेली आहे, तरीसुद्धा अद्याप नेरळ -माथेरान, अशी गाडी सुरू केलेली नाही. शटल सेवा सध्यातरी पर्यटकांसाठी उत्तम पर्याय आहे. या माध्यमांतून रेल्वे प्रशासनाला भरीव उत्पन्नाचे साधन प्राप्त झालेले आहे. 30 ऑक्टोबर रोजी सुरू करण्यात आलेल्या शटल सेवेने अवघ्या काही दिवसांत पाच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न मिळवून दिले आहे. रेल्वे प्रशासनाला एवढे भरीव उत्पन्न मिळूनदेखील त्यांची या गाडीबाबतीत अंतःकरणापासून मानसिकता दिसत नाही. दीड वर्षांपासून सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे शटल सेवा नाममात्र सुरू केलेली असून इथे वाढलेला पर्यटकांची अमर्याद संख्या पाहता कित्येकदा रेल्वेस्थानकात तिकिटासाठी ताटकळत उभे राहावे लागत असून, अनेकदा गर्दीमुळे वादसुद्धा होताना दिसत आहेत.

बोगी वाढवण्याची मागणी
या शटलला पॅसेंजर्सच्या तीन बोगी असून, दोन मालवाहतुकीसाठी बोगी आणि एक प्रथम श्रेणीची बोगी आहे. दोन इंजिन कार्यरत असतात. परंतु, यांतील पाच बोग्या या पर्यटकांना सेवा देण्यासाठी करणे गरजेचे असतानासुद्धा याकडे अधिकारी वर्ग जाणीवपूर्वक कानाडोळा करत आहेत. अनेक कामगार नेरळ येथे असताना त्यांना इकडे वर्ग करून घेतले जात नाही. जुन्या कामगारांऐवजी येथे नवीन कामगार असणे जरुरी बनले आहे. कारण मागील काळात 08 मे 2015 रोजी अमनलॉज स्टेशन जवळच किरकोळ अपघात झाला होता. तो अधिकारी आणि काही कामचुकार कर्मचार्‍यांमुळेच झाला असल्याचे बोलले जात आहे.