मादी बिबट्याचा जीव वाचविण्यात अपयश

राणीपूर वन विभागाच्या कार्यालयात अंत्यसंस्कार*

शहादा:तालुक्यातील कुसुमवाडे नांदे गावा दरम्यान एका शेताच्या बांधावर जखमी अवस्थेत आढळून आलेल्या दोन वर्षीय मादी बिबट्याचा सुमारे साडेसहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर सुटका करण्यात वन विभागाला यश आले आहे. असे असले तरी दुर्दैवाने तिचा जीव वाचविण्यात अपयश आल्याने तिचा मृत्यू झाला. राणीपूर वन विभागाच्या कार्यालयात मयत मादी बिबट्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान वेळीच वनविभागाच्या पथकाने बिबट्याच्या सुटकेसाठी प्रामाणिक प्रयत्न केले. तिचा जीव वाचल्याचा सूर अनेकांच्या प्रतिक्रियामधून उमटला.

बिबट्याची सुटका करण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू असताना तेथे जमा झालेल्या अनेक ग्रामस्थांनी वनविभागाच्या पथकावर दगडफेक केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मयत बिबट्याच्या मृत्यूस वनविभागाचे कर्मचारी जबाबदार असल्याच्या आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. मादी बिबट्याची सुटका केल्यानंतर तिला शहादा येथील मुख्य कार्यालयात आणण्याऐवजी वन विभागाच्या पथकाने राणीपूर वनविभागाच्या कार्यालयात का नेले? यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

सविस्तर असे, कुसुमवाडा गावापासून एक किलोमीटर अंतरावरील नांदे रस्त्याकडे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका शेताच्या बांधावर बिबट्या अडकून पडला असल्याचे स्थानिक ग्रामस्थांना सकाळी निदर्शनास आले.होते. त्यानंतर त्यांनी सकाळी सात ते आठ वाजे दरम्यान वनक्षेत्रपाल एस.के.खुणे यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर वन विभागाचे पथक सुमारे 11 ते 12 वाजेच्या दरम्यान घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत घटनास्थळी मोठ्या संख्येने नागरिकांचा जमाव जमला होता. मादी बिबट्याचा एक पाय कसल्यातरी सापळ्यात अडकल्याचे निदर्शनास आले. मात्र, बिबट्या डरकाळ्या देत असल्यामुळे त्याच्या सुटकेसाठी वनविभागाला कुठलेच प्रयत्न करता आले नाही. अखेर सायंकाळी पाच साडेपाच वाजेच्या दरम्यान कुठलीही वैद्यकीय सुविधा न घेता पथकाने त्याच्या अंगावर जाळी टाकून त्यास जेरबंद केले. त्यानंतर सापळ्यातून त्याचा पाय काढून त्याची सुटका केली. यासाठी वनविभागाच्या पथकाला सुमारे सहा ते साडेसहा तासांचा अवधी लागला.

मादी बिबट्याची सुटका केल्यानंतर त्याची परिस्थिती मरणासन्न होती. तिला राणीपूर येथे वनविभागाच्या कार्यालयात आणत असताना रस्त्यात ती मयत झाली. राणीपूर वनविभागाच्या कार्यालयात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सागर परदेशी यांनी तिच्या पार्थिवावर शवविच्छेदन करून व्हिसेरा व महत्त्वाचे अवयव अधिक तपासणीसाठी मुंबई येथे पाठविल्यानंतर सायंकाळी उशिरा राणीपूर येथील वनविभागाच्या कार्यालयात मयत मादी बिबट्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संपूर्ण परिसरात रानडुकरांचा धुमाकूळ सुरू असल्याने व शेतातील पिके ते नष्ट करत असल्याने त्यांना पकडण्यासाठी स्थानिक शेतकरी काही लोकांच्या मदतीने शेतात सापळा लावतात. अशाच एका सापळ्यात मादी बिबट्याचा पाय अडकला असावा. त्यामुळे तिची सुटका झाली नाही. घटना सकाळी नागरिकांच्या निदर्शनास आली. मात्र, त्याच्या सुटकेसाठी वनविभागाच्या पथकाने आवश्यक ती दखल वैद्यकीय सुविधेसह न घेतल्याने अति रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी त्याला बेशुद्ध करण्यासाठी प्रशिक्षित डॉट गण कर्मचार्‍याला वनविभागाने पाचारण केलेले नाही. परिणामी स्थानिक डॉक्टरांनी त्याला बेशुद्धीचे इंजेक्शन दिल्याने तो मयत झाला असावा, अशीही शक्यता वर्तविली जात आहे.