पिंपळनेर। मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी देशात अनेक महापुरूषाचे मोठे योगदान असून नवीन पिढीला त्याचे कार्य माहित व्हावे, वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी पुस्तक व ग्रंथ खूप जवळचे मित्र आहेत असे सांगून यशस्वी होण्यासाठी वाचन गरजेचे आहे. साहित्य वाचनामुळे मनाने व बुद्धीने मोठे होता येते असे प्रतिपादन अॅड संभाजीराव पगारे यांनी सामोडे येथील माधवस्मृती आश्रमशाळेत मिनी वाचनालयाचे उदघाटनप्रसंगी बोलताना केले.
विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर
लोकमान्य टिळक पुण्यतिथी व शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या नावाने मुलासाठी खास टिळक वाचनालय सुरू करण्यात आले. यावेळी लोकमान्य टिळक व शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संभाजीराव पगारे, संचालक विजयराव सोनवणे, व्ही.एन. जिरेपाटील, अण्णा हरी नेरकर ,मुख्याध्यापक मनेश माळी, उमेश माळी, सर्व कर्मचारी,आदी उपस्थित होते. मिनी वाचनालयाची संकल्पना गोरख पवार यांची आहे. यावेळी आश्रमशाळेतील मुला मुलींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. याप्रसंगी मान्यवरांचे भाषणं झाली. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन गोरख पवार यांनी केले.