माध्यमांची साधने उपलब्ध नसताना इतिहास जिवंत ठेवण्याचे काम शाहिरांनी केले

0

शाहीरी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी प्रभाकर ओव्हाळ यांचे मार्गदर्शन

पिंपरी : ऐतिहासिक काळात दृक-श्राव्य माध्यमांची कोणतीही साधने उपलब्ध नसताना खरा इतिहास जिवंत ठेवण्याचे काम शाहिरांनी केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ लोककला अभ्यासक प्रभाकर ओव्हाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे केले. महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र शाहीर परिषद, पुणे जिल्हा शाखेच्यावतीने शाहिरी महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्या महोत्सवांतर्गत पिंपरीगावात अखिल शिवजयंती उत्सव समिती, पिंपरीगाव आयोजित शाहिरी शिववंदना या कार्यक्रमात प्रभाकर ओव्हाळ बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. नगरसेवक संदीप वाघेरे, नगरसेविका उषा वाघेरे, नगरसेविका अश्‍विनी बोबडे, स्वागताध्यक्ष भीमा बोबडे, महाराष्ट्र शाहीर परिषदेचे कार्यवाह शाहीर प्रकाश ढवळे आणि उपाध्यक्ष बाळासाहेब काळजे उपस्थित होते.

शाहिरांना सन्मानाने वागवावे

आपले मनोगत व्यक्त करताना नंदकुमार सातुर्डेकर म्हणाले की, देश स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती आंदोलन अशा अनेक प्रसंगी वीररसाची निष्पत्ती करण्याचे काम शाहिरांनी केले. अन्याय, अत्याचार या विरोधात लढण्याचे बळ देताना भक्तिरसपूर्ण रचना देखील शाहिरांनी जनमानसात रुजवल्या. शाहीर आणि कलावंत हे स्वाभिमानी असल्याने समाजाने त्यांची दखल घेऊन त्यांना सन्मानाने जगवावे. शाहीर प्रकाश ढवळे यांनी सांगितले की, शिवपूर्वकाळापासून अस्तित्वात असलेल्या शाहिरीकलेचे पुनरुज्जीवन, संवर्धन, प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य स्वर्गीय शाहीर योगेश आणि स्वर्गीय शाहीर किसनराव हिंगे यांनी महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या माध्यमातून केले. संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे अडीच हजार शाहिरी पथके असून शासनाने त्यांना उचित सन्मान द्यावा. कार्यक्रमामध्ये शाहिरी कलेत ढोलकी आणि हार्मोनियम वादन करणार्‍या राजा गायकवाड, हेरंब चिंचणीकर, अर्जुन नेटके, उद्धव गुरव, उल्हास पिलवळकर यांचा पाहुण्यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

पोवाड्यांचे प्रभावी सादरीकरण

पोवाड्यांच्या कार्यक्रमात बालशाहीर प्रथमेश थोरात, हृषीकेश मोतीवाले, प्रीतम, मकरंद यांनी स्त्रीभ्रूणहत्या, पर्यावरण, महाराष्ट्रवर्णन, अफजलखान वध अशा विविध विषयांवरील पोवाड्यांचे प्रभावी सादरीकरण केले. शाहीर बाळासाहेब काळजे यांनी आपल्या पहाडी आवाजातून सादर केलेल्या सिंहगडाच्या पोवाड्याने श्रोत्यांना वीरश्रीचा प्रत्यय दिला. अतिशय रंगतदार झालेल्या पोवाड्यांच्या या सत्राचा समारोप शाहिरा अलका जोशी आणि महिला शाहिरांनी सादर केलेल्या शिवराज्याभिषेकगीताने केला. शीतल कापशीकर यांनी सूत्रसंचालन केले.