मुंबई । सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रसारमाध्यमांनी सरकार आणि जनता यांच्यामधील दुवा म्हणून काम करायला हवे, असे प्रतिपादन मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष दिलीप सपाटे यांनी केले. दुसर्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल मराठवाडा मित्रमंडळातर्फे त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. तेव्हा सत्काराला उत्तर देताना त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पत्रकारांच्या संरक्षणाचा कायदा संमत करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असून पत्रकारांच्या पेन्शनची योजनाही मार्गी लागत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. देशभरातील सर्व राज्यांच्या मंत्रालय पत्रकार संघटनांची लवकरच राष्ट्रीय स्तरावरील कॉन्फरन्स मुंबईत आयोजित केली जाईल आणि पत्रकारांसाठी देशपातळीवर काही महत्त्वाचे निर्णय व्हावेत म्हणून प्रयत्न केले जातील, असेही ते यावेळी म्हणाले.
मान्यवरांची उपस्थिती
चिंतामनी ज्वेलर्सचे आप्पासाहेब निंबाळकर, दैनिक लोकसत्ताचे संजय बापट, दैनिक सकाळचे संजय मिस्किन, दैनिक पुढारीचे चंदन शिरवाळे, दैनिक जनशक्तीचे वृत्तसंपादक राजा आदाटे, दैनिक महासागरचे दीपक कैतके, ठाणे जिल्हा पत्रकारसंघाचे अध्यक्ष संजय पितळे, सरचिटणीस दिलीप शिंदे, मराठवाडा जनविकास परिषदेचे आण्णासाहेब टेकाळे, युवासेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष नितीन लांडगे, दिनेश काकडे, चंद्रशेखर देसाईसर, प्रकाश खैरे, एकता वाहतूक संघाचे अध्यक्ष पांडुरंग घुले, नानासाहेब सोनावणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. सपाटे यांच्या कार्याचा लोखाजोखा अनेकांनी यावेळी मांडला आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या.
पत्रकारसंघाच्या 54 वर्षांच्या कारकिर्दीत अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याचा पहिला मान सपाटे यांना मिळाला म्हणून मराठवाड्यातील सुपुत्रांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते. वयाची साठ वर्षे पुर्ण झालेल्या पत्रकरांसाठी मासिक 10 हजार रूपये पेन्शन देण्याचा सरकारचा मानस आहे. त्याचा पाठपुरावा मंत्रालय पत्रकार संघ घेत असून, मुंबईतील पत्रकारांच्या घरांचा प्रश्नही येत्या काही दिवसात मार्गि लागण्याची शक्यता सपाटे यांनी यावेळी व्यक्त केली. ठाणे जिल्हा पत्रकार संघाने पत्रकारांच्या घरांचा प्रश्न मार्गि लावला तसा मुंबईतील अनेक पत्रकार घरासाठी अजूनही वंचित आहेत. त्यांच्या प्रश्नासाठी गेले वर्षभर सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचे स्मरण त्यांनी यावेळी करून दिले. प्रत्येकारी आपले कर्तृत्व आणि आचरण चांगले ठेवले, तर लोक त्याची दखल घेतात, असे ते म्हणाले. प्रसारमाध्यमे आणि त्यामध्ये काम करणार्या कर्मचार्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघ कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले.