चार हजार ऐवजी मिळणार आठ हजार रुपये
पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या माध्यमिक शाळेत मानधन तत्वावर भरण्यात येणार्या शिक्षकांच्या मानधनात वाढ केली आहे. हे मानधन चार हजार रुपये प्रतिमहावरून आठ हजार रुपये प्रतिमहा असे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात माध्यमिक शाळेसाठी मानधन तत्वावर भरण्यात येणार्या शिक्षकांना पालिकेकडून प्रतिमहा आठ हजार रुपये मानधन मिळणार आहे.
50 शिक्षकांची भरती होणार
महापालिकेच्या शहरात 18 माध्यमिक शाळा आहे. या शाळांध्ये इयत्ता आठवी ते दहावीचे सुमारे 9 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा सरासरी निकाल विद्यार्थ्यांना देण्यात आलेली बक्षिसे व नैसर्गिक वाढ या तत्वावर विद्यार्थी व तुकडी संख्येत वाढ होत आहे. सध्याच्या विद्यार्थी तुकडीनुसार काही विषयांचे शिक्षक तसेच सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्ती व रजा इत्यादी कारणास्तव शिक्षक कमी पडत आहेत. त्यासाठी आगामी काळात 50 शिक्षकांची मानधन तत्वावर भरती करण्यात येणार आहे.
कैलास बारणे यांचा प्रस्ताव
पूर्वी तास बेसिकेवर शिक्षकांना प्रतिमहा चार हजार रुपये प्रमाणे मानधन दिले जात होते. या आल्पशा मानधनावर काम करण्यास शिक्षक नकार देत होते. त्यामुळे शिक्षकांच्या मानधनात 12 हजार रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव गतवर्षी तत्कालीन स्थायी समिती सदस्य कैलास बारणे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत मांडला होता. त्यावर चर्चा होऊन प्रशासनाने 12 हजार रुपयांऐवजी शिक्षकांच्या मानधनात 4 हजार रुपये वाढीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे मानधन तत्वावरील शिक्षकांना प्रतिमहा 8 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव पुढील स्थायी समितीच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.
यापूर्वी शिक्षण सेवकांना प्रतितासाला 54 रुपये मानधन स्वरुपात दिले जात होते. त्यामध्ये वाढ करण्याचा सदस्यप्रस्ताव होता. त्यानुसार यापुढे मानधन तत्वावरील शिक्षण सेवकांना प्रतिमहा 8 हजार रुपये प्रमाणे मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.
-प्रविण अष्टीकर, प्रभारी अतिरिक्त आयुक्त