तुका जाय ते कर,
हाव जाना किदे ते…
तुला हवे ते कर, मी जाणतो काय आहे ते, अशा शब्दांत गोव्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे अखंड गोव्यात वर्णन केले जाते. कोणी कितीही काहीही म्हणत असेल तरीही पर्रीकर त्यांना जे योग्य वाटते तेच करतात, असाही या वाक्याचा अर्थ गोव्यात काढला जातो… असा हा दिग्गज नेता दिल्लीतून गोव्यात दाखल झाला आणि एका वेगळ्याच राजकीय चर्चेला उधाण आले. महाराष्ट्र आणि गोवा राज्याला जोडणार्या मांडवी नदीला गोव्याच्या समुद्रात विलिन होताना जसे भरते येते, तशीच काहीशी परिस्थितीत आज गोव्यात आणि महाराष्ट्रात आहे. खरेतर गोवा हे भारत देशातील सर्वात लहान राज्य… मात्र या लहानग्या राज्यात गेल्या काही दिवसांत ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्या पाहता आणि त्या सर्व घडामोडींचा केंद्रबिंदू असलेले मनोहर पर्रीकर यांचा विचार करता मानकुल्या गोंयचा व्हडलो राजा, असे म्हणावे लागेल. या कोंकणी भाषेतील वाक्याचा अर्थ असा आहे की, छोट्या गोव्याचा मोठा राजा…
मनोहर पर्रीकर एक भला माणूस अशी त्यांची ओळख सांगितली जाते. त्यांनी चौथ्या वेळेला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, मागील तीन वेळात एकदाही पाच वर्षांची टर्म त्यांना पूर्ण करता आली नाही, हे वास्तव आहे. अर्थात, याला अनेक राजकीय कारणे आहेत. तरीही आता ते गोव्याच्या 13व्या विधानसभेचे 14वे मुख्यमंत्री बनले आहेत. तर गोव्याचे 28वे मुख्यमंत्री बनण्याचा मान त्यांना मिळालाय.
गेल्या पन्नास वर्षांच्या गोव्याच्या राजकीय इतिहासात एकूण 28 मुख्यमंत्री झालेत. त्यात गेल्या 10 वर्षांत काँग्रेसच्या काळात दहा वेळा मुख्यमंत्री झाले. यात कित्येकदा एकाच मुख्यमंत्र्यांनी दोनदा शपथ घेण्याचाही प्रसंग गोवेकरांना अनुभवायास मिळाला. काँग्रेसच्या राजवटीनंतर दोनदा मनोहर पर्रीकर यांचे सरकार पडले आणि शेवटी तिसर्यावेळेला त्यांना संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीत नेण्यात आले. गोव्यात सतत सरकार पडण्याची कारणे म्हणजे इथे भाजपला कधीच संपूर्ण बहुमत मिळालेले नाही. मुळात गोवा ही 40 जागांची असलेली विधानसभा आहे. पूर्वी इथे 30 (जागा) आमदार होते. पण नंतर गोव्याला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळाला आणि त्यातच त्यांच्या 10 जागा वाढल्या. गोवा हे देशातील सर्वात लहान राज्य असले तरीही या लहान राज्यामध्ये स्थानिक पक्षांचे प्राबल्य सर्वाधिक आहे. आजच्या गोव्याच्या मंत्रिमंडळातील 11 लोक हे स्थानिक पक्षांमधीलच आहेत. खरेतर गोव्यात यावेळेला 17 अधिकृत पक्षांनी आपले उमेदवार उतरवले होते. अशा परिस्थितीत राष्ट्रीय पक्ष असो किंवा प्रादेशिक पक्ष असो त्यांना संपूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता फारच थोडी असते. यावेळी पहिल्यांदाच गोव्यामध्ये काँग्रेसेत्तर असे संपूर्ण सरकार आले होते.
गोव्यात सुरुवातीपासून मगोप हा पक्ष सत्तेत आहे. त्यानंतर दहा वर्षांपूर्वी काँग्रेसचे सरकार आले आणि मग 2012 ला भाजप आघाडीचे सरकार आले. भाजप 2003 साली इथे पहिल्यांदा सत्तेवर आली. मात्र, संपूर्ण बहुमत नसल्याकारणाने मुख्यमंत्री कोणाचाही असो त्याला पाच वर्षांची टर्म पूर्ण करताच येत नाही. ऐन वेळेला एक किंवा दोन जरी आमदार फुटले तरी सरकार गडगडतेे. याची मोठी परंपरा गोव्याच्या सरकारला आहे. अशा वेळेस संरक्षणमंत्रीपदावरील माणसाला गोव्यासारख्या छोट्या राज्यासाठी परत आणणे हे वरकरणी त्या माणसाचा केला गेलेला वापर असे वाटत असले तरीही वास्तव मात्र वेगळे आहे. सततच्या अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे तिथे मुख्यमंत्री हा खमकाच लागतो. मनोहर पर्रीकर खमके आहेत. 16-16 तास ते काम करतात. विधानसभेच्या अधिवेशनात त्यांच्या मंत्रिमंडळातील कोणत्याही मंत्र्याला विचारण्यात आलेल्या प्रश्नाला पर्रीकर चोख उत्तर देतात. मंत्री उत्तर देतात आणि नंतरचे सगळे प्रश्न आणि त्यांची उत्तरे पर्रीकर देतात, अशी त्यांची सभागृहातील ख्याती आहे. इतकेच नाही तर ऐनवेळी अडचणीत आलेल्या मंत्र्याला विरोधकांच्या प्रश्नातून सहीसलामत बाहेर काढण्याचे कसब पर्रीकरांमध्ये आहे.
गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच का? असा प्रश्न सातत्याने विचारला जातोय. त्याची कहाणी अशी की, सुदिन ढवळीकर (मगोप) आणि विजय सरदेसाई (गोवा फॉरवर्ड) या दोघांनी आधी काँग्रेसला पाठिंबा देण्याचे ठरवले होते. या दोघांना काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे हवे होते. तर प्रतापसिंह राणे हे आज सत्तरी पार केलेले नेते आहेत. शरद पवारांप्रमाणेच त्यांच्याही राजकीय कारकिर्दीला पन्नास वर्षं पूर्ण झालेत. हेच औचित्य साधून प्रतापसिंह राणे यांना मुख्यमंत्री करण्याचा घाट होता. पण सुदिन ढवळीकर आणि विजय सरदेसाई यांना दिगंबर कामत हे मुख्यमंत्री म्हणून हवे होते. मात्र, काँग्रेस कामतांसाठी तयार नव्हती. म्हणून मग ढवळीकर आणि सरदेसाई यांनी भाजपशी हातमिळवणी केली. मात्र, ही हातमिळवणी पर्रीकर मुख्यमंत्री म्हणून परत येत असतील तरच आम्ही तुम्हाला पाठिंबा देवू असे सांगितले गेले.
असा हा गोव्यातील एकूण राजकीय पट आहे. पर्रीकरांशिवाय भाजपकडे पर्याय नव्हता… पर्रीकरांना समाजमान्यता आणि राजमान्यता अशा दोन्ही मान्यता आहेत. स्कुटरवरून फिरणारे मुख्यमंत्री ही त्यांची ओळख आता मागे पडली आहे. तुका जाय ते कर, हाव जाना किदे ते… तुला हवे ते कर, मी जाणतो काय आहे ते, अशा शब्दांत आता मनोहर पर्रीकरांचे वर्णन केले जाते. त्यामुळे अशा मानकुल्या गोंयचा व्हडलो राजा नावाची ही कहाणी पुढे कशी रंगते, हे पाहणे अतिशय उत्सुकतेचे ठरणार यात वादच नाही.
– राकेश शिर्के
9867456984