मानधन वाढीसाठी अंगणवाडी सेविकांचा मोर्चा

0

पुणे । अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ व्हावी तसेच भाऊबीज भत्ता जादा मिळावा अशा विविध मागण्यांसाठी सोमवारी अंगणवाडी सेविकांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले. पाऊस असूनही या आंदोलनात शेकडो सेविका सहभागी झाल्या होत्या.

या मोर्चाची सुरवात जिल्हाधिकारी कार्यालयसमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून झाली. त्यानंतर हा मोर्चा नरपतगिरी चौक, 15 ऑगस्ट चौक मार्गे अपोलो टॉकीज येथून दारुवाला पुल मार्गे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कसबा गणपती कार्यालयासमोर आला. याठिकाणी मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. सेविकांच्यावतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

आहाराच्या दरात वाढ करा
अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याबरोबर आहाराच्या दरात वाढ, टीएचआरची सक्ती करण्यात यावी याही मागण्या यावेळी करण्यात आल्या. अंगणवाडी सेविकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले जाते पण ते प्रश्न सोडविले जात नाहीत. त्यामुळेच अंगणवाडी सेविकांच्यावतीने राज्यातील प्रत्येक मंत्र्यांच्या स्थानिक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.