मानवजातीची पृथ्वीवरून उच्चाटन होण्याकडे वाटचाल!

0

आज जर्मनीतील ‘बॉन’ येथे मानवजातीच्या अस्तित्वाला निर्माण झालेल्या धोक्याबाबत विचार करण्यासाठी पर्यावरणाची जागतिक परिषद सुरू होत आहे. या पार्श्‍वभूमीवर लातूर जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलची खाण सापडल्याबद्दल कौतुक करणारी करणारी पोस्ट वाचली. गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्रात व पूर्ण पृथ्वीवर ऋतुचक्र मोडल्याचा स्पष्ट अनुभव येत आहे. मानवजात व जीवसृष्टीचे प्रजनन व अस्तित्व लाखो, करोडो वर्षे या ऋतुचक्राशी जोडले आहे. ते देण्यात सुयोग्य तापमानाची महत्त्वाची भूमिका आहे. ऋतुचक्र मोडले ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. त्यामुळे मानवजात चालू शतकात पृथ्वीवरून उच्चाटन होण्याकडे वेगाने वाटचाल होत आहे. पृथ्वीचे सरासरी तापमान आता सलग तिसर्‍या वर्षी प्रतिवर्ष 020 ओसे या अभूतपूर्व वेगाने वाढत आहे.

कोट्यवधी वर्षांत अशी वाढ झाली नाही. याचाच परिणाम म्हणून उष्णतेच्या असह्य लाटा, वणवे, अवर्षण, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, महापूर, बर्फवृष्टी, वादळे यांना महाराष्ट्रात व जगभर तोंड द्यावे लागत आहे. यंत्र आल्यावर औद्योगिकीकरण सुरू झाल्यानंतर म्हणजे सन 1750 पासून यंत्रांना चालवण्यासाठी ऊर्जा पुरवण्यासाठी कोळसा, तेल, वायू पृथ्वीच्या पोटातून बाहेर काढून जाळले गेले. तापमानवाढ होण्यास ही खनिज इंधने जाळल्यामुळे पृथ्वीच्या वातावरणात वाढत गेलेले कार्बन डायऑक्साइड व इतर वायू, त्यांच्या उष्णता शोषून धरण्याच्या गुणधर्मामुळे कारण आहेत. या वायूने मे 2015 मध्ये पृथ्वीवर सर्वत्र 400 पीपीएम (1 लाख 20 हजार कोटी टन) हे धोकादायक प्रमाण ओलांडले.

येत्या पाच वर्षांत या गतीने 22ओसेची वाढ सरासरी तापमानात होईल व पॅरिस करार अयशस्वी ठरेल. वातावरणातील हा वायू 600 ते 1000 वर्षे टिकतो. तो पृथ्वीला तापवत राहील. ज्या भागांतून मानवजातीचे प्रथम उच्चाटन होणार त्यात भारतातील, समुद्रापासून सर्वात दूर असलेले व जंगल नष्ट झालेले, त्यामुळे सर्वाधिक तापणारे विदर्भ, मराठवाडा, नागपूर, वर्धा, तेलंगणा इ. प्रदेश आहेत. आता तेथे 50ओसे च्या वर जाणारे, प्रतिवर्षी अर्धा ते पाऊण अंश सरासरीने वाढणारे तापमान व अवकाळी, दुष्काळ, घटते भूजल, बर्फवृष्टी, आकस्मिक वादळे इ. सतत घडणार्‍या दुर्घटना तेच सांगत आहेत. लातूरची भीषण पाणीटंचाई हा त्याचा इशारा आहे. पृथ्वीवरील जीवन पाण्याबरोबर वाढले तेलाबरोबर नाही. निसर्गाने जगण्यासाठी प्राणवायू, पाणी व अन्न दिले. सुमारे 480 कोटी वर्षांपूर्वी सूर्यापासून फेकला गेलेला पृथ्वीचा गोळा धगधगत होता. त्यानंतरच्या शेकडो कोटी वर्षांत हरितद्रव्याने कार्बन डायऑक्साइड वायू शोषला व पृथ्वीला जीवनाचा विकास होण्यासाठी योग्य बनवले. तसे झाले नसते तर गेल्या काही कोटी वर्षांत मानवजात उत्क्रांत झाली नसती. बुद्धीचा तोरा मिरवणारा आधुनिक माणूस हा खरा अज्ञानी आहे. त्याला यंत्र, तेल आणि पैसे हवे, पण प्राणवायू अन्न व पाणी म्हणजे जीवन नको.

वाफेचे इंजिन शोधणारा संशोधक जेम्स वॅट किंवा विजेचा दिवा शोधणारे एडिसन यांना यासाठी लागणार्‍या ऊर्जा पुरवण्यासाठी तापमान वातावरण इ. पृथ्वीच्या मूलभूत बैठकीला व जडणघडणीला धक्का लागेल याचा अंदाज आला नाही, तर तो केवळ पैशांसाठी तेलाचे साठे ताब्यात घेणार्‍या रॉकफेलरसारख्या उद्योजक व्यापार्‍यांना आला असता, अशी अपेक्षाच करता येणार नाही. विज्ञानाचे नाव घेत जगात तंत्रज्ञान वावरले. त्याने पृथ्वीचा व तिच्या जीवनाच्या अद्भुत देणगीचा अनादर केला. अर्थव्यवस्थेने उपभोगवाद वाढवला. येती पाच वर्षे ही मान्सून हवा की मोटार, पाणी हवे की पैसा व अस्तित्व हवे की अर्थव्यवस्था हे निवडण्याची शेवटची संधी आहे. अधिक माहितीसाठी महत्त्वाचे अहवाल दिलेले, ‘मानव व सृष्टीच्या रक्षणासाठी’ हे पत्रक सोबत जोडले आहे.
निमंत्रक भारतीय पर्यावरण चळवळ

– अ‍ॅड. गिरीश राऊत
9869023127