मानवता व चारित्र्य या दोन जीवन मूल्यांमुळे भारत विश्‍वगुरू

0

पुणे । मानवता आणि चारित्र्य या दोन जीवन मूल्यांच्या तत्त्वांमुळे भारताला विश्‍व गुरू म्हणून संबोधू शकतोे. आपल्या येथे शांती, अहिंसा व सत्य या मूल्यांना प्रतिष्ठा असल्याने भारतीाची प्रतिमा ही विश्‍वगुरूची आहे. असे विचार विदर्भातील प्रसिद्ध लेखक व समिक्षक प्रा.डॉ. किशोर सानप यांनी व्यक्त केले.

प्रल्फुल्लता प्रकाशन आणि मानवसेवा फाउंडेशन यांच्या वतीने नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण लिखित ‘समाज संवाद विश्‍वशांती व मानवतेसाठीचा सुसंवाद’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात डॉ. पठाण यांच्या 70व्या वाढदिवसा निमित्य सत्पनीक सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड, कुलगुरू डॉ माणिकराव साळुंके, प्रा.डॉ. अरुण सावंत, प्रा. एन. बी. पासलकर, प्रा. प्रकाश जोशी, ज्येष्ठ संस्कृत तज्ज्ञ पंडीत वसंतराव गाडगीळ, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. रतनलाल सोनाग्रा व श्रीमती जन्नत एस. पठाण उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी पत्राच्या माध्यमातून डॉ. पठाण यांना शुभेच्छा दिल्या.

प्रा. डॉ. पठाण म्हणाले, समाजाशी सुसंवाद साधताना विश्‍वशांती व मानवतेचे विधायक मूल्य समाजात प्रतिष्ठित व्हावे या उद्देशाने, आपल्या जीवनातील अनुभवांचे व समाज संवर्धनाच्या विचारांचे पसायदान या पुस्ताकात मांडले आहे. तसेच, माझ्या जीवनात आलेले उतार-चढाव नमूद आहे. त्या माध्यमातून समाजात अडकलेल्या लोकांना मदत व्हावी यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे आहे. माझे जीवन हे समाजासाठी समर्पित आहे.
डॉ. कराड म्हणाले, समाज उत्थानासाठी हे पुस्तक अत्यंत महत्वपूर्ण आहे. डॉ. पठाण यांच्या नेतृत्वात मानवतेसाठी प्रथमच रामेश्‍वर रूई येथे ‘दर्श-ए-कुराणा’ सप्ताहाचे आयोजन केले.

प्रा. डॉ. किशोर सानप म्हणाले, वर्तमान काळात मानवाचा मानवाशी संवाद तुटत चालला आहे. कुटुंबाशी असलेली संवादाची लयसुद्धा संपलीच आहेे. या सर्वांवर जे उपाय हवे आहेत ते या पुस्तकात सापडतील. तंत्रज्ञानाच्या युगात यंत्र बनण्याऐवजी माणुस बना. संपूर्ण जग हे रोबो बनत आहे पण आपल्या येथे संत ज्ञानेश्‍वर, स्वामी विवेकांनदांनी जी शिकवण दिली आहे, त्यामुळे आम्ही सदैव मानव बनूनच राहू. आजच्या काळात डॉ. पठाण यांचा समाज संवाद हा आत्मसंवाद होणे गरजेचे आहे.

धर्मा-धर्मातील भेदाची दरी कमी करण्यासाठी महत्त्वाचे काम
डॉ. अरुण सावंत म्हणाले, वर्तमान काळात वाढत जाणार्‍या धर्मा-धर्मातील भेदाची दरी कमी करण्यासाठी हे पुस्तक खूपच महत्त्वपूर्ण आहे. डॉ. पठाण हे एक शिक्षक, संशोधक, कुलगुरू या पदावर कार्यरत असणारे आदर्श व्यक्ती आहेत. लेखकाच्या माध्यमातून त्यांनी वाचकांशी उत्तम संवाद साधला आहे. पं. वसंतराव गाडगीळ, डॉ. रतनलाल सोनाग्रा, प्रा. एन. बी. पासलकर यांनीसुद्धा डॉ. पठाण यांनी केलेल्या उच्च कार्याची माहिती दिली. त्याच प्रमाणे त्यांचा जीवन प्रवास उलगडला. या पुस्तकाला विदर्भातील प्रसिद्ध लेखक व समिक्षक प्रा.डॉ. किशोर सानप यांची प्रदीर्घ प्रस्तावना लाभली आहे. प्रा. अतुल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले तसेच आभार मानले.