परभणी : जिल्ह्यातील सेलू ते मानवत रोड महामार्गावर एका स्कॉर्पिओ गाडीने समोरून येत असलेल्या दुचाकीला उडविल्याने दुचाकीवरील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास निपाणी टाकळी पाटीजवळ या अपघाताची घटना घडली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ढेंगळी पिंपळगाव येथील चार जण सेलू येथे सुरू असलेल्या केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम पाहण्यासाठी शनिवारी रात्री आले होते. यात्रा आटोपून दुचाकीवरून ढेंगळी पिंपळगाव कडे जात असताना निपाणी टाकळी पाटीजवळ परभणीकडून सेलूकडे भरधाव वेगात येत असलेल्या स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम.एच.22 यु 8222 ने दुचाकीला समोरून जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील सिध्दार्थ शेषेराव मगर (28), अविनाश महादेव मकासरे (30), सिध्दार्थ आसाराम दवंडे (30)हे तिघेजण जागीच ठार झाले तर कुलदीप आसाराम पंडागळे(28) हा गंभीर जखमी झाला आहे.