नवी दिल्ली येथे रेल्वे बोर्डाचे सदस्य तसेच सुरक्षा अधिकार्यांसोबत उच्चस्तरीय बैठक
रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांची माहिती
भुसावळ । रेल्वेचे वाढते अपघात लक्षात घेता मानव रहित लेवल क्रॉसिंगदरम्यान 34 टक्के दुर्घटना गेल्या वर्षभरात घडल्या आहेत. तर इतर दुर्घटना रेल्वे रुळांच्या खराबीमुळे होत असल्याचे निष्पन्न झाले असून वर्षभरात सर्व मानवरहित लेवल क्रॉसिंग हटविण्यात यावे तसेच अपघातग्रस्त ठिकाणी तातडीने नविन रुळ टाकण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिली. रेल्वेच्या सुरक्षा मुद्यांवर रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे रेल्वे बोर्डाचे सदस्य तसेच सुरक्षा अधिकार्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत रेल्वे सुरक्षाविषयक विस्तृत समीक्षा करण्यात आली. रेल्वे मंत्र्यांनी सुरक्षेला सर्वोच्च प्राथमिकता देण्यावर भर दिला. तसेच मानव रहित लेवल क्रॉसिंग आणि रेल्वे पटरीवरुन उतरण्याची समस्या दूर करणण्यासाठी पाच तात्कालीन उपाय करण्याचे निर्देश अधिकार्यांना देण्यात आले.
नविन रूळाच्या कामास गती
वर्षभरात संपुर्ण भारतीय रेल्वे नेटवर्कवर सर्व मानवरहित लेवल क्रॉसिंग लवकरात लवकर हटविण्यात यावे. आधी यांची मुदत तीन वर्षांची करण्यात आली होती. मात्र आता परिवर्तनशील मंत्र ‘स्पीड, स्किल, स्केल’ नुसार हे काम वर्षभरात पूर्ण करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. रेल्वे रुळ बदलण्यास प्राथमिकता देण्यात यावी, ज्या स्थानकांवर रेल्वे लाईन टाकणे नियोजित आहे. त्या स्थानकांऐवजी अपघातग्रस्त क्षेत्र तसेच ज्याठिकाणी आवश्यकता आहे. तेथे नविन रुळ टाकण्यात येणार आहेत. यास गती देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नविन रुळ खरेदी करण्यात येणार आहेत. पारंपारिक आयसीएफ डिजाईन कोच निर्मिती थांबवून केवळ नविन डिजाईनचे एलएचबी कोच बनविण्यात येणार आहेत. तसेच इंजिनमध्ये धुक्यांचा अडथळा रोखण्यासाठी एलईडी लाईट लावण्यात यावी आदी महत्वपूर्ण सुचना रेल्वे मंत्री गोयल यांनी अधिकार्यांना दिल्या.