अलीकडच्या काही असामाजिक घटना फार विचार करायला लावणार्या आहेत. अंतर्मुख व्हायला भाग पाडताहेत. मात्र आपण एकतर गंभीर नसतो किंवा अशा घटनांवर विचार करण्याची क्षमता व्यवस्थेने हिरावून घेतलीय. गेल्या महिन्यात पंढरपुरात पुजार्याने भाविकाला मारहाण केली आणि कालच एकादशीला लाखो भाविकांची रीघ पंढरीत लागली होती. श्रद्धाळू म्हणवला जाणारा भाविक खरंतर अशा गोष्टींना गांभीर्याने घेत नाही. त्याची भक्ती आणि आसक्ती हीच त्याच्यासाठी महत्वाची. व्यवस्था मात्र तशीच राठ राहते. ती कधीच बदलत नाही. आता देवाला व्यवस्थित सांभाळायला पंढरीत नव्याने समिती बसवलीय, व्यवस्था सुधारेल अशी अपेक्षा आहे.
दुसरी घटना लैंगिक तृप्तीसाठी कासावीस झालेल्या बापाने स्वतःच्याच अवघ्या पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. सचिन शिंदे नावाचा हा नराधम एवढ्यावर थांला नाही. त्या निरागस बालिकेने आजीला हा प्रकार सांगितला. घरातली इज्जत चव्हाट्यावर जाऊ नये म्हणून दोघा माय-लेकरांनी त्या रात्री अघोरी प्लॅन आखला. मुलीला घरात घेऊन आजी आणि बापाने तिचा मरेपर्यंत गळा आवळला आणि पोटच्या लेकराला मारून टाकले. बाप आणि आजीसारख्या नात्यावरून विश्वास उडावी अशी ही घटना. बाप पुरुष म्हणून हैवान बनला मात्र आजी एक स्त्री म्हणून या गोष्टीला साथ कशी देऊ शकली? हा सवाल आहे. पारंपारिक विचाराचे पांघरून घेतलेली आजीही या घटनेत त्या नराधम बापाइतकीच क्रूर आहे.
मागच्याच महिन्यात उल्हासनगर मध्ये दुकानातून दोन रुपयांची चकली चोरली म्हणून दोन लहान बाळांचे डोके भादरून, त्यांना मारहाण करत त्यांचा व्हिडीओ दुकानदाराने बनवला. खरंच समाज म्हणून इतक्या नीच स्तराला पोचलोय का आपण? स्वतःला काय समजायला लागलोय आपण की आपण कायदे हातात घ्यावेत? 5-6 वर्षांची मुले आम्हाला गुन्हेगार दिसायला लागावी? विनय काटे यांनी याचे विश्लेषण करताना अत्यंत मार्मिक शब्दांत वर्णन केले आहे. त्यांनी केलेले काही प्रश्न माणूस म्हणून अत्यंत विचार करायला लावणारे आहेत. कुणी अमक्या-तमक्याने बीफ खाल्ले अशी अफवा उडवावी आणि आम्ही त्याला जीव माराव? कुणी बांग्लादेशी गुप्तहेर आहे म्हणून अफवा उडवावी आणि आम्ही त्या भारतीय माणसाला जाहीररीत्या धिंड काढून जीव मारावे? गाय विकायला चाललेल्या 12 वर्षांच्या मुलाला आम्ही फास देऊन मारावे? मुले पळवणारी टोळी आहे असा आरोप करत आम्ही लोकांना जाहीर दगडाने ठेचून मारावे? महापुरुषांची बदनामी केली म्हणून आम्ही लोकांना ठेचून मारावे? असे अनेक सवाल डोक्याला शॉक देणारे आहेत. ही बातमी विरते तोवर शिक्षकांनी विद्यार्थ्यांची डोकी भादरली असल्याची बातमी आली. हे चित्रच भयावह होत चाललंय.
राज्यातील महत्वाचे नेते असलेल्या एकनाथराव खडसे यांच्या गावातील राष्ट्रपती शौर्य पदकप्राप्त आदिवासी मुलगा निलेश भिल आणि त्याचा लहान भाऊ दोन महिन्यापासून बेपत्ता आहेत. त्यांच्याबाबत अद्याप कुठलीही माहिती मिळून आलेली नाही. त्यांचे काय झाले असेल? हा प्रश्न माझ्यासारख्या अनेक सर्वसामान्य लोकांच्या समक्ष उभा ठाकला आहे. व्यवस्था आणि प्रशासन किती मरगळलेल्या अवस्थेत आहे हे यातून स्पष्ट होतेय. खरतर अवतीभवती अशा अनेक असामाजिक घटनांचे मोहोळ घेऊन फिरणारी माणसं आहोत आपण. अमानवीयतेच्या वस्तीत मानवी चेहरे बनून राहणे कठीण जरी असले तरी आवश्यक आहे.