नवी दिल्ली । मानवी ढालीचा वापर दगडफेक करणार्यांपासून बचाव करण्याचा आदर्श मार्ग असू शकत नाही, असे लष्कप्रमुख बिपिन रावत यांनी म्हटले आहे. मेजर गोगोई यांनी दगडफेक करणार्या जमावापासून बचाव करण्यासाठी मानवी ढालीचा वापर केला होता. मात्र दगडफेक करणार्यांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मानवी ढाल ही काही आदर्श पद्धत असू शकत नाही,असे रावत यांनी म्हटले आहे. लष्कराने कायमच मानवाधिकारांचा सन्मान केला असून कायमच मानवाधिकारांचे संरक्षण केले आहे, असेदेखील रावत यांनी सांगितले. सुरक्षा दलांवर दगडफेक करणार्यांचा मुकाबला कसा करणार, असा प्रश्न बिपिन रावत यांना विचारण्यात आला होता.
काश्मीरबाबत लष्कराचा दृष्टीकोन वेगळा
इतरांकडून ज्या प्रकारे जम्मू काश्मीरमधील स्थिती दाखवते, त्या दृष्टीकोनातून आम्ही जम्मू काश्मीरकडे पाहात नाही. सुरक्षा दलांचे सर्व विभाग उत्तम काम करत आहेत. दक्षिण काश्मीरमधील काही भागांमध्ये संघर्ष सुरु आहे. मात्र त्या ठिकाणची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी योग्य पावले उचलण्यात येतील. त्याबद्दल काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही, असे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी म्हटले.
चुकीच्या माहितीमुळे समस्या
स्थानिक तरुणांकडून सुरक्षा दलाच्या जवानांवर करण्यात येणार्या हल्ल्यांबद्दल यावेळी लष्करप्रमुखांना विचारण्यात आले. या प्रश्नांना उत्तरे देताना चुकीच्या माहितीमुळे आणि अपप्रचारामुळे लोक सुरक्षा दलांवर हल्ले करतात. चुकीच्या माहितीमुळेच समस्या निर्माण होतात आणि काही लोक शस्त्र हातात घेतात. मात्र हाती शस्त्र घेणे योग्य नसल्याचे त्यांच्या लक्षात येईल, असे रावत यांनी म्हटले.