अवघ्या 20 मिनिटांत मिळाली जमानत
पाटियाला न्यायालयाचा निकाल
पाटियाला : प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी व त्यांचा भाऊ शमशेर सिंह यांना 2003च्या मानवीतस्करी प्रकरणी पाटियाला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या दोघांवर बेकायदेशीररित्या लोकांना विदेशात पाठविण्याचे आरोप सिद्ध झाले आहेत. त्याबद्दल या दोघांनाही दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा व दंडही न्यायालयाने ठोठावली. हा निकाल हाती येताच पोलिसांनी दोघा बंधुंना अटक केली. परंतु, मेहंदी यांच्या वकिलांनी तातडीने जामिनासाठी अर्ज दाखल केल्यानंतर न्यायालयाने अवघ्या 20 मिनिटांत त्यांना जामीन मंजूर केला. पाटियाला न्यायालयाने शुक्रवारी झालेल्या सुनावणीत दोषनिश्चिती व शिक्षा ठोठावण्याचा निर्णय एकत्रितच घेतला होता. या दोघांबंधुविरोधात एकूण 31 गुन्हे दाखल झाले होते. तब्बल 15 वर्षानंतर न्यायालयाने आपला निकाल दिला आहे.
आधी अटक नंतर निर्दोष असल्याची बतावणी
दलेर महेंदी आणि त्याचा भाऊ शमशेर हा सामान्य नागरिकांना आपल्या संगीत समूहाचे सदस्य असल्याचे दाखवून नागरिकांना विदेशात पाठवत होते. अवैधरित्या मानवीतस्करीपोटी त्यांना घशघशीत रक्कमही मिळत होती. 1998 आणि 1999 साली या दोघांनी सुमारे दहाजणांना त्यांनी बेकायदेशीररित्या अमेरिकेत नेले होते. याप्रकरणी बक्षीस सिंग यांच्या तक्रारीवरून पाटियाला पोलिसांनी 2003 साली दलेर व शमशेर या दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर या भावांविरोधात अनेक तक्रारीही आल्या होत्या. पाटियाला पोलिसांनी नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेस तेथील मेहंदीच्या कार्यालयावर छापा टाकून कागदपत्रेही जप्त केली होती. 2006 साली पाटियाला पोलिसांनीच न्यायालयात दलेर हा निर्दोष असल्याच्या दोन याचिका दाखल केल्या होत्या. परंतु, या दोघांविरोधात सबळ पुरावे असल्याने न्यायालयाने त्यांच्याविरोधात खटला चालविण्यासाठी या याचिका नाकारल्या होत्या. आता या प्रकरणी न्यायालयाने निकाल देत, दोघांनाही दोषी ठरवले व दोन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. परंतु, त्यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.
काय आहे प्रकरण?
दलेर मेहंदीने 1998 व 1999 मध्ये अमेरिकेत शो केले होते. त्यावेळी एका नायिकेसोबत तो अमेरिकेच्या दौर्यावर गेला होता. या टीममधील 10 जणांना त्याने अमेरिकेत सोडून तो परत आला होता. त्यातील तीन मुलींना त्याने सॅन फ्रान्सिस्कोमध्ये सोडले होते. याप्रकरणी पहिला गुन्हा हा 2003 मध्ये अमेरिकेत दाखल झाला होता. त्याच्या तपासात मानवी तस्करीद्वारे बहुसंख्य व्यक्ती अमेरिकेत पाठवण्यात आल्याचे उघड झाले होते. ऑक्टोबर 1999 मध्येही तो काही अभिनेत्यांसोबत अमेरिकेत गेला होता. त्यावेळी तीन मुलांना त्याने न्यू जर्सीमध्ये सोडले होते.
या मानवीतस्करी प्रकरणाने एकच खळबळ उडाली होती. आता 15 वर्षांनी दलेर मेहंदी हा दोषी ठरला आहे. त्याच्याविरोधात एकूण 31 गुन्हे दाखल झाले होते. 2003 मध्ये दलेरसह त्याच्या भावाला अटक करण्यात आली होती. परंतु, पाटियाला पोलिसांनी तपासात आश्चर्यकारक बदल करत त्याला वाचविण्याचाही प्रयत्न केला होता.